चेन्नई - खासगी शाळांचे पेव फुटल्याने गेल्या काही काळात शिक्षणाचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे मुलांच्या शाळेची फी आणि अन्य खर्च भागवताना अनेक कुटुंबे मेटाकुटीस येतात. दरम्यान, तामिळनाडूतील नागापट्टणम जिल्ह्यामधील वेलिपायम येथे मुलाच्या शाळेची फी जमा करण्यास पैसे नसल्याने एका जोडप्याने आपल्या ११ वर्षीय मुलांसह आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या जोडप्याने मुलाच्या शाळेची फी जमा करण्यासाठी पैसे उधार घेतले होते. मात्र हे पैसे परत करणे त्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी मुलासह आत्महत्या केली, असा दावा या जोडप्याच्या नातेवाईकांनी केला. मृताची ओळख सेंथिल कुमार अशी पटली आहे. पोलिसांनी सांगितले की, सेंथिल कुमार हा पेशाने सोनार होते. हा व्यवसाय हेच त्यांच्या उत्पन्नाचे एकमेव साधन होते. घटना घडली त्यावेळी सेंथिल कुमार यांच्या मित्राने त्यांना अनेकवेळा फोन केला. मात्र ते फोन उचलत नसल्याने या मित्राने त्यांच्या घराकडे धाव घेतली. घरी पोहोचल्यावर सेंथिल, त्यांची पत्नी आणि मुलगा यांचा मृतदेह त्यांना दिसला. त्यानंतर त्यांनी याची खबर पोलिसांना दिली. मुलाच्या शाळेची फी जमा करण्यासाठी सेंथिल यांनी अनेक ठिकाणाहून पैसे उधारीवर घेतले होते, असेही सेंथिल यांच्या मित्राने सांगितले. मोठ्या प्रमाणावर झालेल्या उधारीची परतफेड करणे सेंथिल यांना अवघड झाले होते. त्यामुळे ते तणावाखाली होते. आता मुलाच्या शाळेची फी जमा करण्यासाठी त्यांना उधार पैसे मिळत नव्हते, असे सेंथिल यांच्या नातेवाईकाने सांगितले. सेंथिल यांचा मुलगा एका खासगी शाळेत इयत्त सहावीमध्ये शिकत होता. त्याचा मृतदेह त्याच्या शाळेच्या गणवेशामध्ये आढळला. संपूर्ण कुटुंबाने विष मिसळलेले भोजन केले होते, असे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. दरम्यान, यासंदर्भातील शवविच्छेदन अहवाल येणे अद्याप बाकी आहे. पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र सेंथिल कुमार यांच्या घरातून सुसाईड नोट मिळालेली नाही.
हृदयद्रावक! मुलाच्या शाळेची फी भरण्यास पैसे नसल्याने कुटुंबाने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 2:07 PM