नवी दिल्ली: देशात पुन्हा एकदा नातेसंबंधाच्या प्रतिमेला धक्का देणार घटना उघडकीस आली आहे. पोटच्या मुलीची ती मानसिकरित्या अस्थीर असल्याने संपूर्ण कुटूंबियांनी हत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनं संबंधित परिसर पूर्णपणे हादरून गेला आहे.
उत्तर प्रदेशमधील बारापंकी येथे एका तरुणीची आईसह वडिल आणि भावाने मिळून हत्या केली. हा सर्व प्रकार १६ जानेवारीला घडला असल्याची माहिती समोर आली आहे. या हत्येनंतर आरोपी वडिल मंशाराम, आई मीना कुमारी आणि भाऊ हरिओमला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मृत तरुणी मानसिकरित्या अस्थीर होती. त्यामुळे या कुटुंबीयांना समाजात वावरताना लाज वाटत होती. तिचा भाऊ या हत्येची योजना तीन महिन्यांपासून करत होता. मात्र तिचे आई-वडिलांना यासाठी तयार नव्हते. पण मुलगा आई- वडिलांच्या मागेच लागला होता. त्यानंतर आई-वडिलही स्वत:च्या मुलीची हत्या करण्यासाठी तयार झाले.
वडिलांना मुलाने घराच्या बाहेर उभं राहून पहारा देण्यासाठी सांगितला. त्यानंतर आईने मुलीचे पाय बांधून ठेवले अन् भावाने गळा दाबून तिला ठार केले. यानंतर अनुसुचित जाती जमातीच्या तरुणीवर अत्याचार करुन हत्या झाल्यास तिच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळते. या मदतीच्या लालसेपोटी कुटुंबीयांनी तिच्या गुप्तांगाजवळ जखमा करत अत्याचाराचा बनाव रचला. त्यानंतर घराजवळच्या शेतामध्ये नग्न अवस्थेत सापडला होता. या तरुणीच्या गुप्तांगाच्या जवळ जखमांच्या खुणा होत्या. मृत तरुणीच्या वडिलांनी या प्रकरणात मुलीवर अत्याचार करुन खून केल्याची तक्रारही दाखल केली.
या प्रकरणात घटनास्थळी सापडलेली चप्पल पीडित तरुणीची नसल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्याचबरोबर पोस्टमार्टम रिपोर्टमध्येदेखील तिच्यावर कोणतेही अत्याचार झाले नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर घरातल्या सदस्यांनीच तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आणि सर्वांनाच धक्का बसला.