सूरत - इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) सनरायझर्स हैदराबाद (SRH) चा खेळाडू अभिषेक शर्मा वादात सापडला आहे. सुरतमधील प्रसिद्ध मॉडेल तानिया सिंहच्या आत्महत्येनंतर स्थानिक पोलिसांकडून चौकशीसाठी अभिषेकला समन्स पाठवण्यात आले आहेत. मॉडेल तानियाने २३ वर्षांच्या अभिषेकला शेवटचा कॉल केला होता हे तपासात समोर आले. अशा परिस्थितीत पोलीस सर्व अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहेत.
२८ वर्षीय तानिया फॅशन डिझायनिंग आणि मॉडेलिंग क्षेत्रात काम करायची. इंस्टाग्रामवर तिचे १०००० पेक्षा जास्त फॉलोअर्स होते. तिच्या इंस्टाग्राम बायोमध्ये ती डिस्क जॉकी, मेकअप आर्टिस्ट आणि मॉडेल असल्याचे लिहिले आहे. तानियाच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी सुरतमध्ये तपास सुरू केला. यादरम्यान आयपीएलमध्ये एसआरएच खेळाडू अभिषेक शर्माचे नाव पुढे आले. अभिषेक तानिया सिंहच्या संपर्कात असल्याचे तपासात आढळलं. तपासात असेही समोर आले की तानिया आणि अभिषेक काही काळापासून एकमेकांच्या संपर्कात नव्हते, परंतु पोलिसांनी अभिषेकला चौकशीसाठी बोलावले कारण तो तिचा मित्र होता.
मॉडेल तानिया काल (२० फेब्रुवारी) उशिरा घरी परतली आणि त्यानंतर तिने आत्महत्या केली. मॉडेलचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर तिच्या कुटुंबाला धक्का बसला. या प्रकरणात तानियाच्या कॉल डिटेल्समध्ये अनेक गुपिते दडलेली असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. याशिवाय तिचा शेवटचा फोनही अभिषेक शर्मालाच होता हेही समोर येत आहे. त्यामुळे आत्महत्येमागे प्रेमप्रकरण आहे का? या दृष्टिकोनातून पोलीस सध्या तपास करत आहेत. तानिया गेल्या दीड ते दोन वर्षांपासून ती फॅशन डिझायनिंग आणि मॉडेलिंगचे शिक्षण घेत होती. तानियाने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, अभिषेक शर्मा सध्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादशी संबंधित आहे. तो अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने आयपीएलमधील ४७ सामन्यांमध्ये 137.38 च्या स्ट्राइक रेटने ८९३ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या ७५ आहे. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत ४ अर्धशतके आणि ९ विकेट्स घेतल्या आहेत. अभिषेकला सनरायझर्स हैदराबादने २०२२ च्या आयपीएल लिलावात ६.५ कोटी रुपयांना विकत घेतले होते.