चंडीगड - प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची आज गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. मुसेवाला याच्यावर मनसा येथील जवाहरके गावाजवळ गोळीबार झाला होता. या घटनेनंतर मुसेवाला याला गंभीर अवस्थेमध्ये मनसा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच उपचारांदरम्यान, त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या हल्ल्यात मुसेवालासोबत असलेले दोन अन्य लोकही जखमी झाले आहेत.
मुसेवाला याला गँगस्टर्सकडून धमक्या मिळत होत्या. असं असूनही पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देऊन एक दिवसापूर्वीच मुसेवालासह ४२४ व्हीआयपींची सुरक्षा मागे घेण्यात आली होती. मुसेवाला याने पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे उमेदवार विजय सिंगला यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.
१७ जून १९९३ रोजी जन्मलेला शुभदीप सिंह सिद्धू उर्फ सिद्धू मुसेवाला मनसा जिल्ह्यातील मुसा गावातील रहिवासी होता. मुसेवालाची फॅन फॉलोइंग लाखोंच्या संख्येमध्ये आहे. तसेच तो त्याच्या गँगस्टर रॅपसाठी प्रसिद्ध होता.
सिद्धू मुसेवालाची आई गावची सरपंच होती. सिद्धूने इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये डिग्री मिळवली होती. त्याने आपल्या कॉलेजच्या दिवसांमध्ये संगिताचे शिक्षण घेतले. त्यानंतर तो कॅनडाला गेला होता. मुसेवाला वादग्रस्त पंजाबी गायकांपैकी एक होता. तो खुलेआम बंदुक संस्कृतीला प्रोत्साहन द्यायचा. तसेच उत्तेजक गीतांमध्ये गँगस्टर्सचं उदात्तीकरण करायचा.