औरंगाबाद : शहरातील प्रसिद्ध यू-ट्युबर ‘बिनधास्त काव्या’ ही अल्पवयीन युवती शुक्रवारी दुपारी दोन वाजेपासून बेपत्ता झाली होती. रागाच्या भरात निघून गेलेल्या काव्याला रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) मदतीने काही तासांत शोधण्यात शहर पोलिसांना यश आले. खुशीनगर एक्स्प्रेसमधून तिला ताब्यात घेत मध्य प्रदेशातील इटारसी रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आले असून तिला शहरात आणले जात आहे.
छावणीचे पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज हरिलाल यादव (३७, रा. पडेगाव) यांची १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी अकरावीत देवगिरी महाविद्यालयात शिकते. शुक्रवारी सकाळी तिला रागावल्याने दुपारी ती घरातून न सांगता निघून गेली. तिला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार छावणी पोलिसांत वडिलांनी शुक्रवारी रात्री दिली. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करत पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी पहाटे उशिरापर्यंत गणपती विसर्जन मिरवणुकीत व्यस्त यंत्रणेला वेळीच कामाला लावले.
यू-ट्युबवर ५ मिलिअन फॉलोअर्सयू-ट्युबर ‘बिनधास्त काव्या’ तिच्या नटखट स्वभावामुळे सोशल मीडियावर परिचित आहे. लहान मुले, तरुण आणि आबालवृद्धांमध्येही तिचे रिल्स चांगलेच लोकप्रिय आहेत. तिचे यू-ट्युबवर साडेचार मिलियनपेक्षा जास्त, तर इन्स्टाग्रामवर १ मिलिअन फॉलोअर्स आहेत. याच चॅनलवरून तिच्या पालकांनी मुलीला शोधण्यासाठी मदतीचे आवाहन करत चार तासांचा व्हिडिओ केला. ती यूट्युबवर, खेड्यातील एक दिवस, चुलीवरचं जेवण, कॉलेजमधला पहिला दिवस किंवा पर्यटक म्हणून विविध शहरांमध्ये फिरताना, असे निरनिराळे व्हिडीओ अपलोड करत असते.