हरियाणातील फरिदाबादमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने सेक्टर ८ मध्ये असलेलं खासगी रुग्णालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. रुग्णालय व्यवस्थापनाने या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली असून, त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू आहे. रुग्णालयाच्या कॉल सेंटरवर फोन करून धमकी दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. कॉल करणारी व्यक्ती स्वतःला लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचा दावा करत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास फरिदाबादच्या सेक्टर ८ मध्ये असलेल्या सर्वोदय रुग्णालयाच्या कॉल सेंटरवर कॉल आला. कॉल करणाऱ्याने डॉक्टर संदीप सिंघल यांचा नंबर हवा असल्याचं सांगितलं. कर्मचाऱ्याने सांगितलं की, कोणत्याही डॉक्टरचा नंबर शेअर करू शकत नाही. त्यासाठी रुग्णालयात यावं लागेल. त्यावर फोन करणाऱ्याने तो नेपाळमधील लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचं सांगितलं.
जर तू मला तुझा नंबर दिला नाहीस तर हात-पाय तोडेन, तुम्हा सर्वांना उडवून टाकेन अशी धमकी दिली आहे. कॉल डिस्कनेक्ट झाल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला माहिती दिली. रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी नवीन कुमार यांनी याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात केल्याचं सांगितलं.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना फरिदाबाद पोलिसांचे प्रवक्ते यशपाल म्हणाले की, ३ तारखेच्या रात्री एका खासगी रुग्णालयाच्या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल आला होता, ज्यामध्ये कॉलर डॉक्टरचा नंबर विचारत होता. नंबर दिला नाही तर कॉल घेणाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देत हॉस्पिटल उडवून देण्याबाबत बोलला. या संदर्भात रुग्णालय प्रशासनाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तपास सुरू आहे.