नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. याच दरम्यान फरीदाबादमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या भाच्याची दादागिरी पाहायला मिळाली आहे. पोलीस ठाण्यात तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली असून त्याचं डोकंच फोडलं आहे. यामध्ये तरुण गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री कृष्णपाल गुर्जर (Union Minister Krishan Pal Gurjar) यांचा भाचा अमर चौधरी (Amar Choudhary) याची दादागिरी पाहायला मिळाली आहे.
अमर चौधरी याने एका तरुणाला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली आहे. संतापजनक बाब म्हणजे पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. बेदम मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाला पोलिसांनी उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. फरीदाबादच्या एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. हा तरुण एक इंजिनिअर असून ऑटोमोबाईल कंपनीमध्ये काम करतो. तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, तो मंत्र्याच्या भाच्याच काम करायचा. अमर चौधरी त्याच्याकडून गाड्यांची डिलिव्हरी लवकर तसेच गाड्यांवर डिस्काऊंट घ्यायचा.
तरुणाने काही कामानिमित्त मंत्र्याच्या भाच्याला फोन केला होता. मात्र त्यांनी तरुणाचं ते काम केलं नाही. त्यानंतर तरुणाने मी यापुढे तुम्हाला कोणतंच काम सांगणार नाही असा मेसेज टाईप करून चौधरी याला पाठवला. तरुणाचा मेसेज पाहून भाचा चांगलाच संतापला. त्य़ाने फरीदाबादच्या सेक्टर 28 मधील पोलिसी चौकीत तरुणाला बोलावून घेतलं आणि आपल्या मित्रांच्या मदतीने तरुणाला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. हैराण करणारी बाब म्हणजे पोलिसांसमोर पोलीस ठाण्यातच तरुणाला मारहाण करून त्याचं डोकं फोडण्यात आलं आणि तो जखमी झाला. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.
"मुख्यमंत्रीजी, बेरोजगार असल्याने मी आत्महत्या करतोय; तरुणांना रोजगार द्या"; Video जोरदार व्हायरल
मध्य प्रदेशमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. सैन्यात भरती होण्याचं स्वप्न पूर्ण न झाल्याने एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. गळफास घेऊन आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. या तरुणाने या संदर्भात मुख्यमंत्र्यांना देखील एक पत्र पाठवलं आहे. तसेच आत्महत्येपूर्वी त्याने एक व्हिडीओ तयार केला होता. जो आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये त्याने "मुख्यमंत्रीजी, माझी तुम्हाला विनंती आहे की, विद्यार्थ्यांना रोजगार द्या. बेरोजगारीमुळे मी आज आत्महत्या करत आहे" असं म्हणत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बेरोजगार तरुणाच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातील शेहदखेडी येथे राहणाऱ्या कुंदन राजपूतने 10 जुलै रोजी इंदूरच्या पीथमपूरमध्ये आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वीचा कुंदनचा व्हिडीओ आणि सुसाईड नोट आता समोर आली असून ती जोरदार व्हायरल होत आहे.