Looteri Dulhan News : हरयाणाच्या फरीदाबादमध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे. अजय कुमार नावाच्या व्यक्तीने सांगितलं की, ज्या महिलेसोबत त्याने लग्न केलं ती 'लुटेरी दुल्हन' म्हणून फसवणूक करणारी निघाली. अजयने आरोप केला की, ज्या महिलेसोबत त्याने २०२० मध्ये लग्न केलं होतं. ती त्याच्या घरातून १२ लाख रूपये आणि काही महागड्या वस्तू घेऊन फरार झाली.
अजयने सांगितलं की, मॅट्रिमोनिअल साइटच्या माध्यमातून त्यांची भेट या महिलेसोबत झाली होती. ज्यानंतर दोघांनी लग्न केलं. पत्नीच्या सांगण्यावरून अजयने दिल्लीतील बॅंकेकडून लाखोंचं लोन घेऊन घर खरेदी केलं. सोबतच एक छोटसं कपड्यांचं दुकानही तिला सुरू करून दिलं. महिलेने अजयला सांगितलं होतं की, तिचा पतीसोबत घटस्फोट झाला आहे. काही दिवस चांगल्याप्रकारे राहिल्यानंतर महिला अजयला तिच्या मुलांनाही इथे घेऊन येण्याबाबत बोलू लागली.
अजयला थोडा संशय झाला तर त्याने तिच्याकडे पहिल्या पतीसोबतच्या घटस्फोटाची कागदपत्रे मागवली. पण महिला काहीना काही कारण सांगत राहिली आणि एक दिवस अचानक ऑगस्ट २०२१ मध्ये सगळं काही घेऊन फरार झाली. अजयने महिलेबाबत माहिती काढली तर त्याला समजलं की, महिला एक लुटेरी दुल्हन आहे आणि तिने अशाप्रकारे अनेक लोकांना फसवलं आहे.
न्यूज एजन्सीनुसार, अजय म्हणाला की, त्याने याआधीही फरीदाबाद आणि दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याची तक्रार दाखल करून घेतली नाही. तेव्हापासून तो न्यायासाठी भटकत आहे. त्याला न्याय हवा आहे. तर आदर्श नगर एसएचओ संदीप कुमार यांनी सांगितलं की, अजयची तक्रार घेतली आहे. चौकशी केली जात आहे.