नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी दिल्ली-हरियाणाच्या सिंघू सीमेवर शेतकरी आंदोलनात निहंगांद्वारे एका व्यक्तीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी काही निहंगांना ताब्यातही घेतलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा निहंगांनी एका व्यक्तीला मारहाण करत त्याचा पाय तोडल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निहंगांने मनोज पासवान नावाच्या मजुराला बेदम मारहाण करत त्याचा पाय तोडल्याची घटना घडली आहे. मनोज हा बिहारचा रहिवासी असून, तो अनेक वर्षांपासून मजुरीचे काम करतो. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी निहंगला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, पीडित मनोज पासवान त्याच्या रिक्षातून कोंबड्या घेऊन जात होता, यादरम्यान एका निहंगाने त्याला अडवून फुकट कोंबडी देण्याची मागणी केली. पण, मनोजने नकार दिल्यावर निहंगाने त्याला बेदम मारहाण करत त्याचा पाय तोडला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी मनोजला रुग्णालयात दाखल केलं आणि आरोपीला अटक केलं.
निहंगाकडून लखबीरचा खूनकाही दिवसांपूर्वी याच ठिकाणी निहंगांनी पंजाबमधील मजूर लखबीर सिंगची निर्घृण हत्या केली होती आणि त्याचा डावा हात आणि एक पाय कापला होता. लखबीरवर निहंगांनी गुरु ग्रंथ साहिबचा अपमान केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी सोनीपत पोलिसांनी सरबजीत, गोविंद, भगवंत आणि नारायण सिंग अटक केली होती.