येरोळ (जि. लातूर) : डोंगरगाव (ता. शिरुर अनंतपाळ) येथील एका शेतकऱ्याने बॅकेच्या कर्जाची कशी परतफेड करावी, या आर्थिक विवंचनेतून डोंगरगाव बॅरेजमध्ये उडी घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. याबाबत शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात घटनेची नाेंद करण्यात आली आहे. अजीत विक्रम बन (२४) असे मयत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
पाेलिसांनी सांगितले, शिरूरअनंतपाळ तालुक्यातील डोंगरगाव येथील अजीत विक्रम बन यांची मांजरा नदीलगत शेती आहे. मात्र, अतिवृष्टीच्या पावसाने त्यांच्या शेतीतील सोयाबीन, उसाचे पिकच पूर्णत: वाहून गेले. शिवाय, जमीनही वाहून गेल्याने शेतीचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीबाबत माजी मंत्री आ. संभाजी पाटील-निलंगेकर, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., शिरुर अनंतपाळ येथील तहसीलदारांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. अतीवृष्टीने शेतीचे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी वारंवानर करण्यात आली हाेती. अजीत बन यांनी खरीप हंगामातील पेरणीसाठी काही नातेवाईक, मित्र आणि बॅंकेकडून पीककर्ज घेतले होते. याच कर्जावर त्यांनी शेतातील पेरणी केली हाेती. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे पीकही हातातून गेले. त्याचबरोबर मागील वर्षभरापासून कोरोना महामारीने सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. यामुळे ते सतत पिककर्जाची परतफेड कशी करावी? या आर्थिक विवंचनेत हाेते. यातूनच अजीत बन या तरुण शेतकऱ्याने दिवाळी सणामध्ये भाऊबीजदिवशी डाेंगरगाव येथील बॅरेजमध्ये उडी घेत आत्महत्या केली, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. अजीत बन यांच्या पश्चात वयोवृध्द आजी, आई-वडील, भाऊ, पत्नी, एक दीड वर्षाची मुलगी आहे. याबाबत शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात नाेंद करण्यात आली आहे. अधिक तपास जमादार दयानंद वासुदेव तपास करीत आहेत.