मीरारोड - बेकायदेशीरपणे शेअर भाडे घेणाऱ्या खासगी कारचालकांकडूून प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. गुजरातवरून आलेल्या एका शेतकऱ्याचे ३ लाख ३० हजार रुपये अशाच एका कारचालक आणि त्याच्या साथीदाराने लंपास केल्याचा गुन्हा काशिमिरा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
मीरा रोड रेल्वे स्थानक, भार्इंदरचे सावरकर चौक ( गोल्डन नेस्ट), काशिमीरा नाका, वरसावे नाका आदी ठिकाणा वरील बस स्थानक परिसरातुन काही कार चालक बेकायदेशीरपणे प्रवाशी भाडी नेतात. मुंबई, ठाण्या सह वसई भागात हे कार चालक प्रवाशांना सोडतात. शेअर पध्दतीने चालणारी ही वाहतुक बेकायदेशीर असली तरी प्रादेशिख परिवहन व वाहतुक पोलीसांच्या वरदहस्ताने ती राजरोस चालवली जाते. अशा भाडे नेणाराया कार चालकां कडुन प्रवाशांना लूटण्याचे प्रकार घडत आहेत.
गुजरातच्या लिमडी तालुक्यातील शेतकरी किरण रामु बुटिया (५५) हे मेव्हण्याची मुलगी मंजु व नात दीपिकासह बसने २३ डिसेंबर रोजी वरसावे नाका येथे उतरले. त्यांचा मुलगा ऐरोली येथे रहात असून, चाळीत खोली घेण्यासाठी म्हणून ३ लाख ३० हजारांची रोकड मुलाला देण्यासाठी बुटिया यांनी सोबत आणली होती. बस साठी थांबले असता तेथे एका कार चालकाने शेअर पद्धतीने कळवा नाका येथे सोडतो सांगितले. त्यानुसार ते तिघे गाडीत बसले. आधीच एक महिला त्यात बसली होती. नंतर आत जागा नसताना चालकाने त्याचा एक सहकारी मागाच्या सीट मागील मोकळ्या जागेत बसवला. त्या ठिकाणी आधीच चालकाने बुटिया यांची पैसे ठेवलेली बॅग ठेवण्यास सांगितले होते.
माजिवडा नाका येथे पोहताच कार चालकाने मला मालकाने तात्काळ बोरिवलीला बोलावल्याचे सांगून बुटिया आदींना खाली उतरवले. मागे बसलेला कार चालकाचा सहकारी देखील उतरून निघून गेला. कार चालकाने बॅग बुटिया यांच्या हातात देऊन निघून गेला. त्यांनी बॅग उघडून पाहिली असता आतील रोख रक्कम चोरीला गेली होती.