श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन घोटाळ्या प्रकरणी पैशांची अफरातफर केल्याचे आरोप अब्दुल्ला यांच्यावर आहेत. यानुसार त्यांची ११.८६ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
ईडीने फारुख अब्दुल्ला यांच्या ज्या संपत्ती जप्त केल्या आहेत त्यामध्ये त्यांची तीन घरे देखील आहेत. एक गुपकार रोड, दुसरे तहसील कटिपोरा तन्मर्ग आणि तिसरे भटंडी जम्मूमधील असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय ईडीने श्रीनगरच्या पॉश भागातील अब्दुल्ला यांच्या व्यावसायिक इमारतींवरही जप्तीची कारवाई केली आहे.
ईडीच्या या कारवाईवर नॅशनल कॉन्फरन्सने प्रतिक्रिया दिली असून राजकीय सूड उगविण्यासाठी ही कारवाई केल्याचा आरोप केला आहे. याचबरोबर फारुख उब्दुल्ला यांचे पूत्र आणि माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ईडीच्या कारवाईवर आरोप केले आहेत. ईडीने ज्या मालमत्तांवर कारवाई केली आहे त्या १९७० पासूनच्या वडिलोपार्जित संपत्त्या आहेत. यातील सर्वात लेटेस्ट संपत्ती ही २००३ मध्ये बनविण्यात आली आहे. यामुळे या संपत्ती जप्त करण्यामागे काही ठोस कारण असू शकत नाही. कारण ईडीला तपासादरम्यान गुन्ह्याचा कोणताही पुरावा सिद्ध करण्यात अपय़श आले आहे.