मुंबई - कुख्यात गुंड दाऊदचा साथीदार फारुख देवडीवाला याचा मृत्यू झाला नसून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे. फारूखच्या हत्येनंतर मुंबईतील गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली असून या हत्येमागे कुणाचा हात आहे याचा पाकिस्तानी गुप्तचर संघटना ‘इंटर सर्विस इंटेलिजन्स’ (आयएसआय) यावर लक्ष ठेवून अाहे.
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी खुर्शीद आलम याची गुरुवारी रात्री नेपाळच्या सुनसारी जिल्ह्य़ातील हरिनगर परिसरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आलम याच्यावर दोन बाईकवरून आलेल्या चौघांनी गोळीबार केला. या बाईकच्या नंबरप्लेटवरून त्या बाईक भारतातील असल्याचं समजतं. या हत्येपाठोपाठ देवडीवालाची हत्येचे वृत्त आल्यामुळे दहशतवाद्यांविरोधात गुप्त मोहिम तर राबविली जात नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुंबईतील तरूणांना दुबईत नोकरीचं आमीष दाखवून भारताविरोधात घातपाती कारवायांसाठी तो त्यांना भरती करत असल्याचं नुकतंच पुढं आलं होतं. या प्रकरणात फारूख देवडीवाला याचा मुख्य हात असल्याचं त्यावेळी उघडकीस आल्यानंतर मे महिन्यामध्ये दुबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. भारतात दहशतवादी कारवाई करण्यासंदर्भात अटक करण्यात आलेल्या मुंबईतील फैजल मिर्झा व गुजरातमधील अल्लारखा खान यांना देवडीवालाने शारजामध्ये बोलावलं होतं हे चौकशीतून पुढे आलं होतं.पाकिस्तानात प्रशिक्षण घेऊन ते भारतात परतल्यानंतर गुप्तचर सुरक्षा यंत्रणांना त्यांची माहिती मिळाली. त्यानंतर त्या दोघांनाही महाराष्ट्र एटीएसने अटक केली होती.
भारताला तिसरा झटका; छोटा शकीलच्या हस्तकाला दुबईने पाकिस्तानकडे सोपवलं !