उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh Crime News) फर्रुखाबाद पोलीस स्टेशनचा एक अजब कारनामा समोर आलाय. ज्यात आपल्याच मुलीच्या हत्येप्रकरणी एक वडील तीन वर्षांपासून तुरूंगात शिक्षा भोगत होता. पोलिसांनी या प्रकरणाची व्यवस्थित चौकशी केली नाही. वयोवृद्ध वडील तुरूंगात बंद असल्याची बातमी कथित मृत मुलीला मिळाली तर ती पोलीस अधिक्षकांसमोर पोहोचली. यानंतर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कोर्टाने मुलीच्या वडिलाला सोडलं आणि खऱ्या आरोपींविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
मेरापूरच्या देव सेनी गावातील ही घटना आहे. २०१६ मध्ये इथे राहणाऱ्या ६१ वर्षीय लालारामची मुलगी सोनी अचानक गायब झाली होती. चिंतेत असलेल्या वडिलांनी पोलिसात तक्रार देत सांगितलं की, मुलगी घरी परतली नाही. अनेक दिवस वडिलांनी पोलिसांकडे मुलीला शोधण्याची मागणी केली. पण पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. यानंतर पोलीस मुलीचा शोध घेऊ शकले नाही तर त्यांनी मुलीच्या वडिलांना तुरूंगात डांबलं.
पीडित वडिलांनी ओंकार अजब सिंह, बिशनदयाल, संतोष आणि संतोष देवी यांच्यावर संशय व्यक्त करत २०१६ मध्ये तक्रार दिली होती. पण पोलिसांनी उलट वडिलांनाच जबरदस्ती आरोपी बनवत मुलीच्या हत्ये प्रकरणी तुरूंगात टाकलं. हे प्रकरण त्यावेळी इन्स्पेक्टर सुनील कुमार आणि एसआय मोहम्मद आसिफ यांनी हाताळलं होतं. त्यांनी तथ्य न बघता सोनीची हत्या झाल्याचं सांगितलं. तर लालारामने तिला मारलं.
लालारामला निर्दोष असूनही आपल्या मुलीच्या हत्येप्रकरणी ३ वर्ष तुरूंगात रहावं लागलं. नंतर जेव्हा मुलीला याबाबत समजलं की वडील तुरूंगात आहे तर ती पोलिसांसमोर आली. तिने पोलिसांना ती जिवंत असल्याचं सांगत आपल्या मर्जीने घर सोडून गेल्याचं सांगितलं. तसेच मुलीने वडिलांना सोडण्यास सांगितलं. तिने पोलिसांसमोर सिद्ध केलं की, ती मृत नाही तर जिवंत आहे. ती तिच्या मर्जीने घर सोडून गेली होती. त्यानंतर तिच्या वडिलांना सोडून देण्यात आलं.
सांगण्यात आलं की, २६ मे २०२० रोजी सोनीने एसपीसमोर प्रमाणपत्र आणि शपथ पत्र सादर करून ती जिवंत असल्याचं सिद्ध केलं. तर दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप लावत सांगितलं की, पोलिसांनी त्याला मारहाण करत जबरदस्ती मुलीच्या हत्येचा गुन्हा कबूल करून घेतला.