अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई गँगची दहशत आणखी वाढली आहे. या गँगच्या नावाने आता सतत धमक्या येऊ लागल्या आहेत. माझगाव डॉकमध्ये राहणाऱ्या एका फॅशन डिझायनरला लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचा फोन आला आहे. आरोपीने त्याच्याकडे तब्बल ५५ लाख रुपयांची खंडणी मागितली आहे.
मुंबईतील शिवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अनोळखी नंबरवरून फोन आला. त्याने ५५ लाख रुपयांची खंडणी मागितली. फोन करणाऱ्याने फॅशन डिझायनरला धमकी देत पैशाची व्यवस्था करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली. आमच्या विरोधात जाऊ नकोस, तू कौटुंबिक माणूस आहेस. तुला जीवाची पर्वा आहे की नाही? असं देखील धमकी देणाऱ्याने म्हटलं आहे.
सुरुवातीला फॅशन डिझायनरने या धमकीच्या फोनकडे दुर्लक्ष केलं. पण, अलीकडे अशा घटना वाढत असल्याने एका ओळखीच्या व्यक्तीने त्याला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. यानंतर फॅशन डिझायनरने शिवडी पोलीस ठाणं गाठून अज्ञाताविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याची गँग गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे येथील त्यांचा मुलगा झिशानच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. बाबा सिद्दिकी यांचे अभिनेता सलमान खानशी जवळचे संबंध असल्याने त्यांची हत्या करण्यात आल्याचं गँगचं म्हणणं आहे.
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, गौरव विलास अप्पुने (२३) नावाच्या व्यक्तीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. त्याचा या प्रकरणात सहभाग असल्याची पुष्टी झाली आहे. त्याला हत्येची पूर्ण माहिती असल्याचं तपासात निष्पन्न झाल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणातील ही १६वी अटक आहे.