गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने कुरिअर डिलिव्हरी स्कॅममध्ये अडकून 1.38 लाख रुपये गमावले आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, 25 वर्षीय फॅशन डिझायनर मितीक्षा शेठने पालडी येथील एका व्यक्तीकडे कपडे शिवण्यासाठी दिले होते. ती त्या पार्सलची वाट पाहत होती. ऑर्डर पूर्ण झाल्यावर त्या व्यक्तीने ती डिलिव्हरीसाठी पाठवली आहे असं सांगितलं.
2-3 दिवसांनंतरही पार्सल आले नाही, तेव्हा तिने दिलेल्या कुरिअर डिटेल्सवर ऑर्डर ट्रॅक करायला सुरुवात केली. तथापि, वेबसाइटवर पार्सल ट्रॅक केल्यानंतर काही मिनिटांत, महिलेला एका अज्ञात व्यक्तीकडून कॉल आला, ज्याने स्वतःची ओळख कुरिअर फर्मचा कर्मचारी म्हणून दिली. त्याने सांगितले की त्याच्याकडे पार्सल आहे आणि डिलिव्हरी चार्ज भरल्यानंतर ते वितरित केले जाईल. त्याने पार्सल घेण्यासाठी पाच रुपये फी भरण्याची विनंती केली.
कॉलरने महिलेसोबत पैसे देण्यासाठी लिंकही शेअर केली. महिलेने लिंकद्वारे पाच रुपये दिले. मात्र, पैसे भरल्यानंतर तिला पुन्हा एकदा वाढीव शुल्क म्हणून 5 रुपये भरण्यास सांगण्यात आले. "दुसऱ्या व्यवहारानंतर, मला ऑनलाइन फसवणुकीचा संशय आला आणि त्यामुळे माझे बँक खाते निष्क्रिय केले. मी प्रवास करत असल्यामुळे 13 मे ते 21 मे दरम्यान माझा सेलफोन वापरला नाही" असं महिलेने म्हटलं.
काही दिवसांनी महिलेने तिचे खाते तपासले असता तिच्या बँक बॅलन्समध्ये कमी पैसे होते. जेव्हा मी माझ्या मित्राला काही पैसे पाठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला कळले की माझ्या खात्यात पुरेसे शिल्लक नाही असं सांगितलं. महिला दुसऱ्या दिवशी बँकेत गेली. 12 मे आणि 13 मे रोजी चार व्यवहार झाले आणि तिच्या खात्यातून 1.38 लाख रुपये डेबिट झाल्याची माहिती मिळाली. तिने सायबर क्राईम हेल्पलाइनवर कॉल केला आणि तक्रार दाखल केली. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.