मनीषा म्हात्रे
मुंबई : देशभरात व्हॉट्सअॅप हेरगिरी प्रकरण गाजत असताना, मुंबईतील एका २८ वर्षीय फॅशन डिझायनरचे व्हॉट्सअॅप हॅक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. फेसबुकवरून मैत्रीण बोलत असल्याचे भासवून तरुणीचा व्हॉट्सअॅप क्रमांक आणि ओटीपी क्रमांक मिळवला. पुढे व्हॉट्सअॅपद्वारे अश्लील व्हिडीओ शेअर केले. या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार फॅशन डिझायनर सायन परिसरात कुटुुंबासह राहते. ३ नोव्हेंबर रोजी मैत्रिणीच्या फेसबुकचा वापर करत तिच्याशी चॅटिंग सुरू झाले. मैत्रीणच बोलत असल्याचे भासवून तरुणीचा व्हॉट्सअॅप क्रमांक आणि ओटीपी क्रमांक घेतला. काही वेळाने तिच्या व्हॉट्सअॅपद्वारे अश्लील व्हिडीओ शेअर झाले. ते पाहून तरुणीला धक्का बसला. तिने मैत्रिणीकडे याबाबत विचारले, मात्र तिला काहीच माहीत नव्हते. दोघींनाही तो व्हिडीओ पाहून धक्का बसला. त्यांनी थेट सायन पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आयटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यात तिच्या मैत्रिणीच्याही बनावट फेसबुक खात्याचा यात वापर करण्यात आला होता. संबंधित व्यक्ती कोण आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. यामागे आॅनलाइन ठग आहे की अन्य कुणाचे षड्यंत्र आहे, आदींबाबत पोलीस तपास करत आहेत. तांत्रिक पुराव्याच्या आधारे सायन पोलीस ठाण्याचे सायबर पथक अधिक तपास करत आहे.अद्याप अटक नाही, अधिक तपास सुरूया प्रकरणी नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. दाखल तक्रार तसेच उपलब्ध माहितीच्या आधारे अधिक तपास सुरू असल्याची माहिती सायन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्ष्ज्ञक (गुन्हे) संजय पोपळघट यांनी दिली.