अबुजा : नायजेरियामध्ये भीषण अपघात झाला आहे. एका बसने अन्य एका वाहनाला टक्कर मारली. यामध्य़े २० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. नायजेरियाच्या ओयो राज्यातील इबारपा भागात हा अपघात झाला आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी या अपघाताची माहिती दिली. इबारपा जिल्ह्याचे अध्यक्ष गबेंगा ओबालोवो यांनी सांगितले की, ही एक भीषण दुर्घटना होती. आम्ही पूर्णपणे जळालेले २० हून अधिक मृतदेह ताब्यात घेतले आहेत. वेगाने वाहन चालविल्याने हा अपघात झाल्याचे ते म्हणाले.
प्रवाशांना घेऊन जात असलेल्या दोन वाहनांमध्ये समोरासमोर टक्कर झाली. यानंतर बसला आग लागली. ही आग विझविता आली नाही. दोन जणांची प्रकृती गंभीर आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
नायजेरियाच्या खराब रस्त्यांवर अतिवेगाने आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अपघात होत आहेत. या वर्षी जुलैच्या सुरुवातीला वायव्य नायजेरियातील कादुना राज्यात महामार्गावर तीन वाहनांच्या धडकेत 30 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतरचा हा दुसरा मोठा अपघात आहे. रोड सेफ्टी कमिशनच्या आकडेवारीनुसार, नायजेरियामध्ये गेल्या वर्षी 10,637 रस्ते अपघातांची नोंद झाली, ज्यामध्ये 5,101 लोकांचा मृत्यू झाला आणि 30,000 हून अधिक लोक जखमी झाले.