नितिन पंडीत
भिवंडी - भिवंडीहून ठाण्याला पाईप लाईनच्या रस्त्याने मैत्रिणी सोबत कार मधून जाणाऱ्या तरुणाच्या कार समोर दुचाकी आडवी घालून जबरदस्तीने कार उघडून तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना १२ ऑक्टोबर २०२१ रोजी भिवंडीतील पिंपळास डोंगराळी परिसरात घडली होती . हल्लेखोरांनी तरुणासह त्याच्या मैत्रिणीकडील मोबाईल व सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला होता . याप्रकरणी कोंगाव पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता . घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कोनगाव पोलिसांचे तीन पथक नेमून तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने या अज्ञात हल्लेखोरांच्या मुसक्या आवळण्यात कोनगाव पोलिसांना यश आले असून या हल्लेखोरांकडून चोरी केलेले साहित्य देखील हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती भिवंडीचे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे .
अब्दुल कादिर अबरार शेख (वय २४ वर्षे, रा. मोईवाडा, कल्याण ) , उमर अब्दुल रहेमान मन्सुरी ( वय २४ वर्षे, रा. गोविंदवाडी, कल्याण, प), निहाल नजीर शेख (वय २३ वर्ष रा, गोविंदवाडी, कल्याण,प) अशी अटक केलेल्या लुटारूंची नावे आहेत. तर या चोरट्यांकडून चोरीचा मुद्देमाल घेणाऱ्या दोघांनाही अटक केली आहे. आकाश राजेश कंडारे (वय २४ वर्षे),सलमान उर्फ नजीब मस्जीद शेख (वय २७ वर्ष) असे चोरीचा मुद्देमाल विकत घेणाऱ्या अटक आरोपींचे नावे आहेत.
ठाण्यातील पाचपाखाडी भागात राहणारे दर्शिल हितेश गुढ़का ( वय २७ वर्ष ) हे त्यांच्या मैत्रिणीसोबत १२ आक्टोंबरच्या मध्यरात्री आपल्या कारने भिवडी पाईपलाईन रोडने डोगराळीकडुन घरी ठाणे येथे जात होते. त्यावेळी अचानक रेल्वे पुलाखाली अनोळखी तिन जणांनी त्याच्या कार समोरच दुचाकी आडवी लावून उभी केली. विचारपूस करत असतांनाच जबरदस्तीने कार उघडून दर्शीलवर जीवघेणा हल्ला करत तिघा चोरटयांनी त्याचा मोबाईल हिसकावला तसेच मैत्रीणकडीलही मोबाईल, गळ्यातील सोन्याची चेन व हातातील सोन्याची अंगठी असा एकूण ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने काढून घेतला. त्यावेळी दर्शिलने चोरट्यासोबत प्रतिकार केला असता त्याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार करून चोरट्या हल्लेखोरांनी घटनस्थळावरून पळ काढला होता. तर चोरट्यांच्या हल्ल्यात दर्शिल याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातारवण निर्माण झाले होते .
चोरटयांनी गुन्हा करताना निर्जनस्थळ व रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन केला होता. त्यामुळे पोलिसांकडे हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी कुठलाही सुगावा नसल्याने पोलिसांसोर मोठ आव्हान होते. या गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन पोलीस पथके नेमली होती. त्यांनतर पोलीस तपासात व गुप्त बातमीदारामार्फत तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्हयातील अब्दुल कादिर अबरार शेख, उमर अब्दुल रहेमान मन्सुरी, निहाल नजीर शेख, यांना कल्याणमधून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, तिघांनाही गुन्हा केल्याचे कुबल केले. मात्र लुटमारीतील मुद्देमाल इतर दोघांना विक्री केल्याने मुद्देमाला हस्तगत करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचून आकाश राजेश कंडारे, आणि सलमान उर्फ नजीब मस्जीद शेख दोघांनाही अटक करून त्यांच्याकडून चोरीचा विकत घेतलेला मुद्देमाल जप्त केला. तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त केली असून हे पाचही जण सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त योगेश चव्हाण यांनी दिली. तर हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे , गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक किरणकुमार वाघ यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक पराग भाट यांच्यासह पथकाने विशेष परिश्रम घेतले .