उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात एका मुलाने आपल्याच आईची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाला आईच्या विम्याचे 50 लाख रुपये हवे होते. हत्या केल्यानंतर मुलाने आपल्या आईचा मृतदेह पोत्यात बांधून यमुना नदीच्या काठावर असलेल्या ढिगाऱ्यामागे फेकून दिला. गावकऱ्यांना मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.
मुलाच्या संशयास्पद हालचालींवरून वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर मुलगा घरातून पळून गेला. या घटनेत आणखी दोन जणांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलीस तपासात व्यस्त आहेत. आईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावून मुलगा घरी परतला होता. तेवढ्यात त्याचे वडीलही मंदिरातून आले. त्यांनी आपल्या मुलाला पत्नीबद्दल विचारले असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यानंतर त्यांची नजर घरात पडलेल्या पत्नीच्या चप्पलवर पडली आणि त्यांना संशय आला.
चुलत भावासह पत्नीच्या शोधासाठी ते यमुना नदीच्या काठी पोहोचले. तेथे पोत्यात भरलेला मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गोणी उघडली असता महिलेचा मृतदेह पोत्यात भरलेला दिसला. त्यावर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो पोस्टमार्टमसाठी पाठवला. पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.
धाता पोलीस स्टेशन हद्दीतील छोटी अढौली गावातील रहिवासी रोशन सिंह सोमवारी संध्याकाळी चित्रकूट जिल्ह्यातील राजापूर येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मंगळवारी दुपारी दर्शन घेऊन ते परत आले असता त्यांना त्यांची पत्नी प्रभा देवी घरी नसल्याचं दिसलं. मुलगा हिमांशूला त्याच्या आईबद्दल विचारले असता, त्याने उत्तर दिलं नाही. त्यामुळे त्यांना संशय आला.
या घटनेबाबत रोशन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाने माझा आणि माझ्या पत्नीचा प्रत्येकी 50 लाख रुपयांचा विमा उतरवला आहे. विम्याचे पैसे मिळवण्यासाठी त्याने आईची हत्या केली. यापूर्वीही त्याने मामाच्या घरातून दागिने गायब केले होते. हिमांशू पॉलिसीमध्ये नॉमिनी होता. सध्या पोलिसांनी रोशन यांच्या तक्रारीवरून मुलगा हिमांशूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फरार हिमांशूचा शोध सुरू आहे.