गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई : बापाने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार लेकीने पोलीस ठाण्यात केली. त्यानुसार, पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत पोक्सोअंतर्गत गुन्हाही दाखल करत बापाला अटक केली. खटला पाच वर्ष चालला आणि अखेर मुलीच्या आईने दिलेल्या जबाबामुळे याप्रकरणात ट्विस्ट येऊन कधी केलेच नव्हते अशा पापामधून बापाची सुटका करण्यात आली. कांदिवली पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अल्पवयीन मुलीने तिच्या सावत्र बापावर ‘ते वारंवार माझ्या जवळ येतात आणि अश्लील चाळे करतात’, असा आरोप शेजारणीशी बोलताना केला.
याबाबत आईला सांगितले तर तिला माझ्या बोलण्यावर विश्वास नाही, असेही सांगितल्याने शेजारणीसोबत जाऊन तिने कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलिसांनी बापाला अटक केल्याने त्याला कारागृहाची हवा खावी लागली. मात्र, आपला पती आपल्या लेकीसोबत असा काही प्रकार करणार नाही, असा विश्वास पत्नीला होता. त्यानुसार, तिने पोलीस ठाण्यात जाऊन सत्य परिस्थिती सांगितली. ज्यामुळे नेमके काय घडले याचा खुलासा झाला.
मित्राला चपराक म्हणून बापाला ‘कारावास’पीडितेच्या आईने पोलिसांना दिलेल्या जबाबनुसार, तिच्या लेकीचे एका २० वर्षाच्या मुलावर प्रेम होते. मात्र, त्याला अंमली पदार्थांचे व्यसन होते. त्यामुळे आपली लेक त्याच्यासोबत आनंदी राहू शकणार नाही हे पतीला माहीत होते. याबाबत समजावूनही ती त्याला लपून छपून भेटायची. त्यांना एकत्र फिरताना सावत्र बापाने पाहिले आणि सर्वांसमक्ष त्याच्या श्रीमुखात भडकावली. त्यामुळे तिच्या मित्राने तिच्याशी संबंध तोडले. सावत्र बापामुळे आपण आपले प्रेम गमावले याचा राग मुलीच्या मनात होता आणि बदला घेण्यासाठी अखेर तिने बापावर खोटा आरोप करत त्याला कारावास भोगायला लावला.
पीडित मुलीची रवानगी ही बालसुधारगृहात करण्यात आली. काही महिने त्याठिकाणी राहिल्यावर आई-वडिलांची आठवण तिला येऊ लागली. तिने केलेल्या कृत्याचा तिला पश्चाताप झाला आणि अखेर तिने तक्रार मागे घेतली. मात्र, घरी गेल्यावर वडिलांनी झाल्याप्रकाराबाबत तिला कोणताही दोष न देता लेकीचे स्वागतच केले. तसेच उत्तर प्रदेशात चांगले स्थळ पाहून तिचे लग्न जमवले.
आम्ही फक्त मित्रचपीडितेच्या मित्राचा जबाबही पोलिसांनी नोंदवला. यात त्याने संबंधित मुलगी त्याची फक्त मैत्रीण होती, असे म्हटले आहे. तसेच तिच्याशी लग्न करू शकत नाही, असेही नमूद केले.
'हॅप्पी एंडिंग' होत नसतेमी पोक्सोसारख्या खोट्या गुन्ह्यातून माझ्या निर्दोष आशिलाला बाहेर काढू शकलो, याचा आनंद आहे. येत्या २५ फेब्रुवारी रोजी त्याच्या सावत्र लेकीचे लग्न होणार असून ती सुखी आयुष्याकडे वाटचाल करणार आहे. आमच्या याप्रकरणाची हॅप्पी एंडिंग झाली. मात्र, निर्दोष व्यक्तीच्या बाबतीत नेहमीच, असे होईल याची शाश्वती नाही. त्यामुळे आपल्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्याचा वापर जबाबदारीने करणे गरजेचे आहे. - ॲड. महेश राजपोपट, सावत्र बापाचे वकील