लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तब्बल ३७ किलो वजनाच्या आणि २३ कोटी रुपयांचे मूल्य असलेल्या सोन्याच्या तस्करी प्रकरणी केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी झवेरी बाजारात कार्यरत असलेल्या भोसले पिता-पुत्रांना अटक केली आहे.
परदेशातून जे सोने तस्करीच्या माध्यमातून मुंबईत येत होते, ते सोने वितळवून त्याची तो विक्री करत असे. सोने वितळविण्याचा जो कारखाना होता तो भोसले यांच्या मालकीचा असल्याची माहिती तपासादरम्यान अधिकाऱ्यांना मिळाली आणि या माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सूरज भोसले आणि धर्मराज भोसले या पिता-पुत्रांना अटक केली आहे. हे दोघेही या तस्करीच्या रॅकेटचा भाग असल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले. दरम्यान, जानेवारीमध्ये डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी साडेतीन कोटी रुपये मूल्याची ५.८ किलो सोन्याची तस्करी पकडली होती. त्यावेळीच हे एक मोठे रॅकेट असल्याची माहिती मिळाल्यानंतर डीआरआयने याप्रकरणी सखोल तपासणी केली.