राजस्थानमध्ये प्रेमप्रकरणाशी संबंधित गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. राजस्थानमधील आदिवासीबहुल डुंगरपूर जिल्ह्यातील ओबेरी पोलीस स्टेशन परिसरात मुलीचे लग्न होताच एका व्यक्तीने आपल्या जावयावर तलवारीने हल्ला केला. त्यामुळे विवाहस्थळी एकच खळबळ उडाली. या व्यक्तीची मुलगी दोन महिन्यांपूर्वी प्रियकरासह पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. पित्याने मनाविरूद्ध मुलीचं लग्न प्रियकराशी लावून दिलं. पण राग काय़म होता. लग्न होताच त्याच्यावर हल्ला केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण ओबेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरबोदनिया गावाशी संबंधित आहे. काळुराम यादव यांची कन्या भावना हिच्या लग्नासाठी खरगडा गावातील चिराग यादव यांची वरात सोमवारी सकाळी आली होती. लग्नाबाबत दोन्ही कुटुंबात उत्साहाचे वातावरण होते. लग्नाची वरात येताच वधूच्या कुटुंबीयांनी तिचे स्वागत केले. लग्नाची मिरवणूक बँड वाजवत, नाचत गात वधूच्या घरी आली.
वधू-वरांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्नाचे सर्व विधी पार पडले. लग्नात सप्तपदी घेतल्यानंतर काही वेळाने सासरे काळूराम यांनी जावई चिराग यादवला खोलीत नेले. तेथे त्याने चिराग यादव याच्यावर तलवारीने हल्ला केला. अचानक हल्ला होताच चिरागने घाबरला. नवरदेवावर हल्ला झाल्याचे समजताच तेथे एकच खळबळ उडाली. नववधू भावना पती चिरागला वाचवण्यासाठी आली असता वडिलांनी तिच्यावरही तलवारीने हल्ला केला आहे.
दरम्यान, वराला वाचवण्यासाठी आलेला त्याचा भाऊ अनुराग, कुटुंबासह रोहित वैष्णव हेही जखमी झाले. या घटनेनंतर तेथे एकच गोंधळ उडाला. याच दरम्यान, या घटनेची माहिती कोणीतरी पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले. जखमींना सागवाडा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भावना दोन महिन्यांपूर्वी प्रियकर चिरागसोबत पळून गेल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. यावर वडील काळूराम यांनी ओबेरी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. यानंतर तिने चिरागसोबतच लग्न केल्याचे सांगितले. मुलीच्या हट्टासमोर वडिलांनी होकार दिला. पण काळूराम आपल्या मुलीच्या या प्रेमविवाहाने खूश नव्हते. या कारणावरून लग्न होताच वडिलांनी त्याचा बदला घेण्यासाठी वरावर तलवारीने वार केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.