नागौर - राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात एका व्यक्तीने पत्नी, नातू आणि विवाहित २ मुलींवर जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेत २ मुलींचा मृत्यू झाला असून पत्नी आणि नातू दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या या दोघांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हे कृत्य करण्यापूर्वी आरोपी बापाने मुलाच्या खोलीच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी मानसिक आजारी असून कुठल्यातरी कारणावरून झालेल्या वादातून त्याने हे खतरनाक पाऊल उचलले आहे.
नागौर जिल्ह्यातील ढाणी गावांत राहणाऱ्या मानारामने सोमवारी रात्री कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. त्यात २ विवाहित मुलींचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पत्नी, नातू गंभीर अवस्थेत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. आरोपीच्या मुलाने पोलिसांना सांगितले की, सोमवारी संध्याकाळी किरकोळ कारणावरून मानसिक आजारग्रस्त वडिलांचे कुटुंबासोबत वाद झाला होता. भांडण संपल्यानंतर आम्ही सर्व झोपायला गेलो. मी माझ्या खोलीत गेलो होतो. २ बहिणी, आई आणि भाचा दुसऱ्या खोलीत झोपले होते.
माझ्या खोलीला वडिलांनी बाहेरून कडी लावली. मी पहाटे ५ वाजता दूध विक्री करण्यासाठी जातो. सकाळ झाल्यानंतर मी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला परंतु तो उघडत नव्हता. तेव्हा मी जोरजोरात आवाज द्यायला लागलो तेव्हा शेजारील लोक घरात आले आणि त्यांनी दरवाजा उघडला. खोलीतून बाहेर आलो तेव्हा पाहिले की, वडिलांनी विवाहित बहीण मीरा आणि रेखा दोघींवर कुऱ्हाडीने वार केला होता. तर आई केसरदेवी आणि ७ वर्षीय भाचा प्रिंस गंभीर अवस्थेत आढळले. वडिलांनी रात्रीच्या वेळीच हे कृत्य केले.
गावातील सरपंचाच्या सूचनेनुसार, पोलिसांना बोलावण्यात आले. सर्व मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवले तर दोघांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. आरोपी मानारामला पोलिसांनी अटक केली. प्राथमिक उपचारानंतर जखमींना पुढील रुग्णालयात उपचारासाठी शिफ्टिंग करण्यात आले. सोमवारी रात्री ही घटना घडली. मंगळवारी सकाळी मीरा तिच्या सासरी जाणार होती. मीराचं १० वर्षापूर्वी लग्न झाले होते. तर रेखाच्या लग्नाला २ वर्ष झाली.
पोलिसांनी आरोपीला हत्येच्या आरोपाखाली बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी मानाराम हा ५ वर्षापासून मानसिक रुग्ण आहे. घरात झालेल्या वादानंतर त्यांनी हे भयानक पाऊल उचलले. हत्येसाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड पोलिसांनी जप्त केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पुढील कार्यवाही सुरू आहे.