इंदूर: मध्य प्रदेशच्या इंदूरनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. पेशानं पेंटर असलेल्या विष्णू चौहान नावाच्या व्यक्तीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांना त्याच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. विवाहित प्रेयसीच्या कुटुंबानं त्रास दिल्याचा आणि कर्जाचा उल्लेख चिठ्ठीत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
विष्णू चौहानचा मृतदेह मंगळवारी संध्याकाळी राहत्या घरात पत्नीला आढळून आला. तिनं शेजाऱ्यांना बोलावलं. त्यांनी विष्णूला तातडीनं रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. घराची पाहणी करून पोलिसांनी ते सील केलं. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
पोलिसांनी विष्णूच्या खिशात एक चिठ्ठी आढळली. त्यात प्रेयसीकडून होत असलेल्या त्रासाचा उल्लेख आहे. 'मी विष्णू चौहान, आत्ममहत्या करतोय. बिचोली मर्दानामध्ये वास्तव्यास असलेली माझी प्रेयसी रिनानं तीन वर्षे माझा वापर केला. तिचा भाऊ माझ्या १३ वर्षांच्या मुलीला घेऊन पळून गेला. गेल्या वर्षभरापासून त्यानं तिला स्वत:च्या गावी ठेवलं आहे. रिनानं मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करू दिली नाही. मात्र आता तिला स्वत:ची इभ्रत आठवली. या कटात रिना मालवी, तिचा पती सुरेश मालवी, भाऊ दिनेश, राधे आणि करण यांच्यासह तिच्या आई वडिलांचा समावेश आहे. धर्माबाई आणि आत्माराम अशी तिच्या आई वडिलांची नावं आहेत. त्यांना त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळायला हवी,' असं विष्णूनं चिठ्ठीत म्हटलं आहे.
शवविच्छेदनानंतर पोलिसांनी बुधवारी सकाळी विष्णूचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. या प्रकरणी आझाद नगर पोलीस पुढील तपास करत आहेत. अद्याप कुटुंबीयांचे जबाब घेण्यात आलेले नाहीत. जबाब नोंदवल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. विष्णूच्या मोबाईलचीही तपासणी करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.