कल्याण : डोंबिवली येथील टिळकनगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यातून मोहन चंदन (७८) आणि त्यांची विवाहित मुलगी गौरी पतंगे (वय ४६ वर्षे) या बाप लेकीची कल्याण प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी प्रशांत तौर यांनी सोमवारी निर्दोष सुटका केली.२०१२ मध्ये डोंबिवलीतील टिळकनगर पोलीस ठाण्यात मोहन आणि गौरी यांच्याविरोधात दुखापत करणे, शांतता भंग करणे आणि विनयभंग यासारखे गुन्हे दाखल करण्यात आले होते.डोंबिवली येथील पांडुरंग निवास, कलावती मंदिर शेजारी येथे राहणारे डेव्हलपर आणि मालक मोहन चंदन ह्यांच्याशी सदर इमारतीत राहणाऱ्या इतर भाडेकरू ह्यांचे नेहमी इमारतीच्या कामासाठी मेंटेनन्सचे पैसे न देण्यावरून गेली अनेक वर्षे वाद सुरू आहेत. आणि त्यासाठी कल्याण न्यायलायात दिवाणी तसेच फौजदारी खटले सुरू असल्याचे त्यांचे वकील ए. आर. शेख यांनी सांगितले. ग्राहक न्यायालयात सुद्धा एक खोटा खटला दाखल केला होता, ज्याचा निर्णय सुद्धा मोहन चंदन ह्यांच्या बाजूने लागला होता. सदरच्या गुन्ह्यात सुद्धा त्यांचा काहीही संबंध नसताना त्यांना गुंतवले होते अशी माहिती वकील तृप्ती पाटील यांनी दिली. बचाव पक्षातर्फे वकील ए. आर. शेख आणि तृप्ती पाटील यांनी काम पाहिले.
खोट्या गुन्ह्यातून बाप-लेकीची सुटका, कल्याण न्यायालयाचा निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 9:36 PM