अहमदाबादमधील बोपल येथील एमआयसीएमध्ये शिकणाऱ्या प्रियांशु जैन या विद्यार्थ्याची १० नोव्हेंबर रोजी झालेल्या हत्येनंतर बोपल पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एक हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आता एका प्रॉपर्टी डीलरची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. बोपल पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
अहमदाबादमधील बोपल येथील गरोडिया गावाजवळ ६५ वर्षीय प्रॉपर्टी डीलर दीपक पटेल यांचा मृतदेह सापडला आहे. काही वेळात परत येईन असं सांगून दीपक काल दुपारी घरातून निघाले होते. मात्र अनेक तास उलटूनही ते रात्री उशिरापर्यंत घरी परत आले नाहीत. तसेच त्यांच्याशी कोणताच संपर्कही होऊ शकला नाही, अशी माहिती दीपक पटेल यांच्या पत्नीने अमेरिकेत राहणाऱ्या आपल्या मुलांना दिली.
अमेरिकेतील मुलांनी त्यांच्या वडिलांचा आयफोन ट्रॅक करून त्यांचं लोकेशन शोधून काढलं. सकाळी मुलांनी सांगितलेल्या ठिकाणी कुटुंबीय पोहोचले असता त्यांना दीपक पटेल यांचा मृतदेह तेथे दिसला. मारेकऱ्याने दीपक पटेल यांची निर्घृणपणे हत्या केली होती. आजूबाजूचा परिसरही रक्ताने लाल झाला होता.
बोपल पोलीस ठाण्याचे निरीक्षक बीटी गोहिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गरोडिया गावाजवळ एका वृद्धाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर हत्येचा तपास सुरू करण्यात आला आहे. संशयितांची चौकशी सुरू आहे. एफएसएल टीमचीही मदत घेतली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.