पीलीभीत - यूपीच्या पीलीभीत इथं मुलामुलीची हत्या करून वडिलांनी आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. मृतकाच्या खिशातून जेव्हा सुसाईड नोट सापडली तेव्हा पोलीसही हैराण झाले. हे सगळं आत्मानं केलंय, बदला पूर्ण झाला असं या सुसाईड नोटमध्ये लिहिल्याने पोलिसांनाही धक्का बसला. सुसाईड नोटमध्ये जो काही उल्लेख केलाय ते ऐकून गावकऱ्यांची झोप उडाली आहे.
या ३ मृतदेहांच्या पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये मुलांचा मृत्यू गळा दाबून तर वडिलांचा मृत्यू गळफास घेतल्याने झाल्याचं उघड झाले. मिळालेल्या माहितीनुसार, रंबोझा गावत बुधवारी सायकल दुकानदार बालकरामने स्वत:च्या पोटच्या मुलामुलीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याने गळफास घेत आयुष्य संपवलं. पोस्टमोर्टम रिपोर्टनंतर तिघांचे मृतदेह गावात आले. या तिघांवर एकत्रच अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
बालकरामनं जी सुसाईड नोट लिहिली आहे ती वाचून गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. बालकरामच्या खिशात ४ पानी सुसाईड नोट आढळली. ती वाचून कुणी बोलून ही नोट लिहून घेतलीय असं वाटत आहे. याबाबत पोलीस अधीक्षक दिनेश पी यांनी म्हटलंय की, या आत्महत्या प्रकरणाची चौकशी सुरू असून सुसाईड नोट नेमकी कुणी लिहिली याचा शोध घेतला जात आहे. सुसाईड नोटमधील राइटिंग टेस्टिंगसाठी पाठवलं आहे. हे तंत्र-मंत्राचं प्रकरण वाटतंय. त्यामुळे सर्व अँगलने तपास केला जाईल असं पोलिसांनी म्हटलं.
काय आहे प्रकरण? पीलीभीतमध्ये बालकराम नावाचा व्यक्ती सायकल दुरुस्तीचं काम करायचा. त्याला ११ वर्षीय मुलगा आणि १५ वर्षीय मुलगी होती. मुलामुलींचे मृतदेह बेडवर पडलेल्या अवस्थेत सापडले. तर बलकरामचा मृतदेह दुसऱ्या खोलीत गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. बाजूच्या खोलीत असलेल्या १४ वर्षीय मुलाने हा सगळा प्रकार पाहिला त्याने कुटुंबातील अन्य सदस्यांना याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमला पाठवले. अंधविश्वासामुळे व्यक्तीने आधी मुलांची हत्या केली त्यानंतर स्वत: गळफास घेतला.