गुजरातमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांकडे आपल्या आजारी मुलाच्या उपचारासाठी पैसे नव्हते. १५०० रुपयांसाठी त्यांनी फुलं विकणाऱ्या महिलेची हत्या केली. यानंतर मृतदेह लटकवण्यात आला. लोकांनी पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धपूर तालुक्यातील लुखासन गावात ही घटना घडली. २० जुलै २०२४ च्या रात्री गावाबाहेरील हनुमान मंदिराच्या मागे झुडपात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. लोकांनी पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून माहिती घेतली. ओळख पटवली असता, मृत महिला मंदिराबाहेरील हार-फुलं विकत असल्याचं आढळून आलं. केसरबेन रावल असं महिलेचं नाव आहे.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. महिलेचा गळा आवळून खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. यानंतर मृत महिलेचा मुलगा आशिष रावल याने अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांसह अनेक पथकांनी तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. जवळपासचे लोक, शेतकरी, मजूर अशा एकूण ८०० जणांची चौकशी करण्यात आली. कल्पेश वाल्मिकी याने हत्या केल्याचा पुरावा मिळाला. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली.
डीवायएसपी केके पंड्या यांनी सांगितलं की, पोलिसांनी आरोपी कल्पेशची चौकशी केली असता काही धक्कादायक बाबी समोर आल्या. आरोपी कल्पेशचा मुलगा आजारी होता. त्याच्यावर सिद्धपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. कल्पेशकडे उपचारासाठी पैसे नव्हते. त्याने आई-वडील, भाऊ आणि मित्रांकडे पैसे उसने मागितले, पण पैसे मिळाले नाहीत. यानंतर ते सकाळी साडेआठ वाजता हनुमान मंदिरात गेला. तिथे एक महिला मंदिराबाहेर नारळ, हार आणि पूजा साहित्य विकत होती.
महिलेकडे पैसे असावेत, असं आरोपी कल्पेशला वाटत होतं. त्याने महिलेवर हल्ला केला आणि महिलेकडे असलेले १५०० रुपये लुटले. महिला गावातील सर्वांना हे सांगेल असं त्याला वाटलं. त्यामुळे त्याने महिलेची साडीने गळा आवळून हत्या केली आणि महिलेने आत्महत्या केल्याप्रमाणे मृतदेह लटकवला. ही घटना घडल्यानंतर आरोपी कल्पेश घरी पोहोचला, कपडे बदलून मुलावर उपचार करण्यासाठी गेला.