नवी दिल्ली - देशातील अनेक भागात आजही लग्नामध्ये हुंडा दिला जातो. पैसे, गाडी, भेटवस्तुंच्या माध्यमातून हुंडा घेतला जातो. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लेकीच्या लग्नात हुंडा द्यावा लागू नये म्हणून एका पित्याने कट रचला आणि जेव्हा ते सत्य समोर आलं तेव्हा सर्वच जण हादरले. उत्तर प्रदेशमधील बिजनौर गावात ही घटना घडली आहे. लेकीच्या लग्नात हुंडा द्यावा लागू नये म्हणून वडिलांनी स्वतःच्याच घरात चोरी झाल्याचा बनाव आखला.
पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास करत असताना या घटनेची पोलखोल झाली. पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दाखल करण्याच्या आरोपाखील त्याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी कुंडा खुर्द या गावातील रहिवाशी दयाराम यांनी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली होती. चोरांनी घरातून 80 हजारांची रोकड आणि काही लाखांचे दागिने लंपास केले, असल्याचं त्याने तक्रारीत म्हटलं होतं.
पोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतर एका खोलीतील कपाटात लपवून ठेवलेले दागिने सापडले. पोलिसांनी दयारामची कसून चौकशी केल्यानंतर त्यांने खरी परिस्थिती सांगितली. 22 जूनला लेकीचं लग्न होतं. लग्नात वरपक्षाला अधिक हुंडा द्यावा लागू नये म्हणून त्यानेच घरात चोरी केल्याचा बनाव केला. घरात चोरी झाल्याचे कळताच वरपक्षाकडून सहानुभूती मिळेल व ते हुंडा न घेता लग्नाला तयार होती.
शेजारील व्यक्तीसोबतही दयारामचे भांडण होते. त्यामुळं या चोरीच्या आरोपात त्यांना फसवण्याचा कटही दयारामने रचला होता. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी दयारामला अटक केली आहे. त्याच्यावर खोटी तक्रार दाखल करण्याबरोबरच विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.