मुंबई: वडिलांनी डोक्यात पक्कड मारली अशी तक्रार चाईल्ड लाईन जिल्हा महिला बाल विकासच्या १०९८ या हेल्प लाईनवर १४ वर्षांच्या मुलीने केली. त्यांनतर हेल्प लाईनच्या संबंधित अधिकाऱ्याने याप्रकरणी तिच्या वडिलांविरोधात तक्रार दिल्यावर अंधेरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार मुलगी पायल ही अंधेरी पूर्वच्या जे बी नगर परिसरात वडील रिकी लुईस (३५) यांच्या सोबत राहते. तिला आई नसून वडील हे किरकोळ कारणावरून सतत मारहाण करून त्रास देतात असा आरोप तिने नोव्हेंबर, २०२३ मध्ये चाईल्ड लाईनला कॉल करत केला होता. त्यानुसार चाईल्ड लाईनच्या सुपरवायझर शोभा आगाशे (४६) यांनी तिच्या घरी भेट देत तिच्या वडिलांकडे चौकशी केली. त्यावर ती कोणाचेही ऐकत नसून कोणतेही काम करत नाही असे त्यांनी सांगितले. आगाशी यांनी मुलीची समजूत काढल्यावर तिने व्यवस्थित राहून शाळेत जाईन असे मान्य केले.
तसेच याप्रकरणी तिची कोणतीही तक्रार नसल्याचेही ती म्हणाली. त्यानंतर आगाशे अधुनमधून चौकशी करायला तिच्या घरी भेट देत होत्या. तेव्हा तिला कोणताही त्रास नसल्याचे तिने त्यांना सांगितले. मात्र ४ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता आगाशेना पायलचा फोन आला आणि तिच्या वडिलांनी लोखंडी पकडीने तिच्या डोक्यात मारल्याचे ती म्हणाली. त्यावर आगाशे या दुसऱ्याच दिवशी सकाळी तिच्या घरी गेल्या. त्यांनी हल्ल्याचे कारण विचारले असता सकाळी ५.३० वाजता अभ्यास करताना वडीलांनी तिला घरात राहू नकोस असे म्हणत तिच्या डोक्यात पक्कड मारून दुखापत केली. तसेच शिवीगाळ करून तुला बघून घेतो अशी धमकी दिल्याचे तिने सांगितले. त्यानुसार आगाशी यांनी पायलला अंधेरी पोलीस ठाण्यात नेत तिच्या वडिलांविरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी रिकीच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३२४, ५०४, ५०६ आणि अल्पवयीन न्याय ( मुलांची काळजी व संरक्षण) कायदा कलम ७५ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.