जयपूर : राजस्थानच्या जयपूरमध्ये एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. ऑनलाईन क्लास दरम्यान एका मुलीच्या वडिलांनी चुकून शाळेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अश्लील व्हिडिओ अपलोड केले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपीला पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.
जयपूरमध्ये वडिलांनी कथितरित्या आपल्या मुलीच्या शाळेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चुकून 10 अश्लील व्हिडिओ पोस्ट केले. ऑनलाइन क्लास दरम्यान ग्रुपमध्ये आलेले हे अश्लील व्हिडिओ पाहून सर्वांनाच धक्का बसला. मुलांच्या पालकांसह शाळा प्रशासनही आश्चर्यचकित झाले. त्यानंतर शाळा प्रशासनानेच याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली.
जयपूरच्या मुहाना परिसरातील कल्याणपूरच्या शासकीय शाळेत ऑनलाइन क्लासदरम्यान, शाळेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधील मुलांच्या मोबाईलवर 10 अश्लील व्हिडिओ एकामागून एक आले. याबाबतची माहिती मिळताच प्राचार्य राम प्रसाद चावला यांनी मुहाना पोलीस स्टेशनमध्ये पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
यानंतर तपासात असे आढळून आले की, इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीच्या वडिलांच्या मोबाइलवरून अश्लील व्हिडिओ शाळेच्या ग्रुपमध्ये आले आहेत. पोलिसांनी आरोपी वडील साबीर अली यांना अटक केली आहे. याबाबत आरोपी वडील साबीर अली यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मोबाईलमधील हे अश्लील व्हिडिओ कुठून तरी आले होते आणि चुकून शाळेच्या ग्रुपमध्ये पाठवले, असे साबीर अली म्हणाले.
मुलीच्या ऑनलाईन क्लास आणि होमवर्कसाठी शाळेतून 2 फोन नंबर मोबाईलमध्ये जोडण्यासाठी आले होते आणि आरोपी त्यांना लिंक करत होता. दरम्यान, चुकून हे अश्लील व्हिडिओ ग्रुपमध्ये गेले. पोलिसांच्या माहितीनुसार, हा गंभीर गुन्हा आहे आणि पॉक्सो कायद्यांतर्गत 5 वर्षांची शिक्षा होऊ शकते. हा गंभीर गुन्हा मानून पोलिसांनी आयटी कायदा आणि पॉक्सो कायद्याव्यतिरिक्त कलम 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.