ठाणे : आपल्याच १३ वर्षीय मुलीवर (रात्रीच्या अंधाराचा तसेच तिच्या बालमनाचा गैरफायदा घेऊन) वारंवार बलात्कार करून तिला गर्भवती करणाऱ्या ४५ वर्षीय पित्याला ठाणेन्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची तसेच २५ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास २५ महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षाही विशेष जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. वीरकर यांनी सुनावली आहे.
पीडित मुलगी ही नवी मुंबईतील एपीएमसी परिसरात आई, वडिलांसमवेत वास्तव्याला होती. दारूचे व्यसन असलेल्या पित्याने तिच्याशी मे २०१७ ते २८ डिसेंबर २०१७ या कालावधीमध्ये २० पेक्षा अधिक वेळा बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली होती. ती गर्भवती राहिल्यानंतर तिच्या आईच्या निदर्शनास हा प्रकार आला. याप्रकरणी मुलीच्या आईने आपल्या नराधम पतीविरुद्ध कलम ३७६ सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाखाली एपीएमसी पोलीस ठाण्यात २८ डिसेंबर २०१७ रोजी गुन्हा दाखल केला.
यातील आरोपी पित्याला सहायक पोलीस निरीक्षक राम चोपडे यांच्या पथकाने २८ डिसेंबर २०१७ रोजी अटक केली होती. या खटल्याची सुनावणी ठाण्याच्या पोस्को न्यायालयात न्या. वीरकर यांच्यासमोर १३ मे २०२२ रोजी झाली. सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी आरोपीला शिक्षा मिळण्यासाठी जोरदार बाजू मांडली. यामध्ये सात साक्षीदार तपासण्यात आले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक प्रशांत कुंभार, तर न्यायालयीन अंमलदार म्हणून जमादार शिवाजी कवरे यांनी काम पाहिले.