लखनौ – उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका अल्पवयीन मुलीनं तिच्या वडिलांवर गंभीर आरोप लावला आहे. दिल्लीत कार्यरत असलेल्या रेल्वे अधिकाऱ्याच्या मुलीनं याबाबत वडिलांविरोधात पॉक्सो, विनयभंग आणि बलात्कार आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपासानंतर वडिलांविरोधात चार्जशीट दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली.
मुलीवर आई-भावाला गोळी मारल्याचा आरोप
२९ ऑगस्ट २०२० मध्ये लखनौच्या गौतम पल्ली परिसरात राहणाऱ्या रेल्वे अधिकारी बाजपेई यांची पत्नी मालिनी दत्त बाजपेई आणि मुलगा दत्त बाजपेई यांची गोळी मारून हत्या केली होती. सुरुवातीच्या तपासानंतर पोलिसांनी आरडी बाजपेई यांच्या अल्पवयीन मुलीवर दुहेरी हत्याकांडाचा आरोप आला होता. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने नैराश्येत आई आणि भावाला गोळी मारली होती. खूप दिवसांपासून मुलगी नैराश्येत होती. तिची मानसिक स्थिती ठीक नसल्यानं तिने हे पाऊल उचललं.
मुलीनं वडील-आत्याविरोधात गुन्हा दाखल केला
आता २३ नोव्हेंबर २०२१ रोजी अल्पवयीन मुलीनं तिचे वडील आणि आत्या पिंकी तिवारीविरोधात बलात्काराचा आरोप लावत गुन्हा दाखल केला आहे. FIR मध्ये आरोप लावला आहे की, वडिलांनी २०१३ पासून तिचं शारिरीक शोषण करण्यास सुरुवात केली. आई-भावाच्या मृत्यूनंतर तिला वडिलांसोबत दिल्लीला जावं लागलं. त्याठिकाणी वडिलांनी शारिरीक शोषणास सुरूवात केली. त्यात आत्या पिंकीही साथ देत होती. आत्या जबरदस्तीनं रात्री वडिलांच्या खोलीत जाण्यासाठी दबाव टाकत होती.
या प्रकरणी पोलिसांनी चौकशी केली. मुलीचा जबाब नोंदवण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी वडील आरडी बाजपेई यांच्याविरोधात कलम ३७६, ३२३ आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी दोन्ही आरोपींनी हायकोर्टातून अटकेला स्थगिती मिळवली असून सध्या दोघांना नोटीस पाठवून कोर्टात हजर केले जात आहे. मात्र अल्पवयीन मुलीनं वडिलांविरोधात लावलेल्या आरोपामुळे सगळेच हैराण झाले आहेत. पोलीस या प्रकरणी आणखी तपास करत आहेत.