महोबा-
उत्तर प्रदेशातील महोबा येथे एका पित्यानं दिवसाढवळ्या आपल्याच मुलावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. मुलगा गंभीररित्या जखमी झाला असून जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले आणि चौकशीला सुरुवात केली. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली असून चौकशी केली जात आहे.
आरोपीनं दिलेल्या कबुली जबाबानुसार त्याचा धाकटा मुलगा आपल्या सावत्र भावासोबत राहात होता. दोघांनी एकत्र राहू नये अशी वडिलांची इच्छा होती. पण वडिलांचं दोघंही अजिबात ऐकत नव्हते. आरोपी शिवनारायण शर्मा याच्या दोन पत्नी आहेत. पहिल्या पत्नीचा मुलगा सत्यनारायण तर दुसऱ्या पत्नीचा मुलगा सत्यदेव हे दोघंही एकमेकांशी गुण्यागोविंदानं वागतात. हेच वडिलांना नको होतं.
पहिल्या पत्नीला माहेरी पाठवलंआरोपीची पहिली पत्नी तिच्या माहेरीच असते. शिवनारायण आपल्या पहिल्या पत्नीच्या मुलाला गावी सोडून तो दुसरी पत्नी सरोजसह महोबा येथे वास्तव्याला होता. सावत्र भाऊ असूनही सत्यनारायण आणि सत्यदेव यांच्याच चांगले नातेसंबंध आहेत. गेल्या महिन्याभरापासून दोघं एकत्रच राहात होते. शिवनारायण आणि त्याची दुसरी पत्नी सरोज यांना हे मान्य नव्हतं. अनेकदा दोघांनी सावत्र भावांना एकमेकांना भेटण्यापासूनही रोखलं. पण ते ऐकले नाहीत. यातच एकदा संतापाच्या भरात शिवनारायणने आपल्या थोरल्या मुलावर गोळी झाडली. यात मुलगा गंभीर जखमी झाला. दिवसाढवळा गावात घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली.
आरोपी बापाला अटक केलीगंभीर जखमी झालेल्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर त्याला झांशीच्या मेडिकल रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवलं आहे. या प्रकरणी पोलीस अधिक्षक सुधा सिंह यांनी आरोपी बापाला अटक केली असल्याची माहिती दिली आहे.