छत्रपती संभाजीनगर - आयुष्याची दोरी बळकट असल्याने वाचलेल्या ८ वर्षीय शिवमने पोलिसांना सांगितलेल्या आपबीतीने ऐकणाऱ्यांच्या अंगावर शहारे आले. ‘पप्पाने आधी श्रेयसला विहिरीत फेकल्यानंतर मी रडू लागलाे. त्यांनी मलाही विहिरीत फेकले, विहिरीत पडताच अंधारात हाताला लागलेला दोर मी धरला, दुसऱ्या हाताने श्रेयसचा हात पकडला. मात्र, तो हातातून निसटून पाण्यात बुडाला.’
बाप पोटच्या गोळ्याच्या जिवावर उठलेला परंतु हा लहानगा जीव धाकट्या भावाला वाचविण्यासाठी धडपडत होता. चिकलठाण्यातील राजू प्रकाश भोसले या मद्यपीने पत्नी नांदायला येत नसल्याने शिवम (८) आणि श्रेयस (४) या त्याच्या दोन्ही मुलांना शुक्रवारी रात्री विहिरीत फेकले होते. यात श्रेयसचा मृत्यू झाला. आरोपीला अटक झाली.
दारूच्या नशेत राजू वाद घालत असल्याने पत्नी तीन महिन्यांपूर्वी माहेरी गेली होती. तेव्हापासून राजू सासू, सासऱ्यांनाही पत्नीला सासरी पाठवावे, म्हणून फोनवरून शिवीगाळ करत असे.