पिंपरी : पत्नी नांदत नसल्याने पित्यानेच सासरवाडीहुन तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना गुन्हे शाखेच्या युनिट-४ने अवघ्या बारा तासांत उघडकीस आणली. पित्यासह दोघा आरोपींना वाकड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
शोभा रामदास डोळस (वय ४०, रा. जीवननगर ताथवडे) यांनी नातू वीरेंद्र महावीर साळवे या तीन वर्षांच्या नातवाचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. दुचाकीवर आलेल्या व्यक्तीने ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले होते.
लहान मुलाच्या अपहरणाची गांभीर्याने दाखल घेत उपयुक्त सुधीर हिरेमठ यांनी गुन्हे शाखेला समांतर तपास करण्याचे आदेश दिले. सहायक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, प्रवीण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, लक्ष्मण अढारी, प्रशांत सैद यांचे पथक नेमले. तांत्रिक विश्लेषण आणि माहिती घेत असताना मितेश उर्फ मितवा मारुती भगत (वय २५, रा. मळोली, ता. माळशिरस, सोलापूर) या इसमाने अपहरण केल्याची शक्यता असल्याचे दिसून आले. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भगत रास्ता पेठेतील केईएम हॉस्पिटल जवळ लपल्याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेतले असता, गावाकडच्या माणसाच्या सांगण्यावरून मुलाला पळवल्याचे त्याने सांगितले. मुलगा महावीर साळवे (रा. मळोली, ता. माळशिरस, सोलापूर) यांच्याकडे असून, तो उरळी कांचन बस डेपो येथे नातेवाईकांच्या घरी असल्याचे सांगितले. त्याच्या आधारे बुधवारी पहाटे पोलिसांनी तिथे जात जाऊन आरोपी वडिलाला आणि अपहरण झालेल्या मुलाला ताब्यात घेतले. तीन वर्षीय मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली असून त्याला आईच्या ताब्यात देण्यात आले आहे. दोन्ही आरोपींना वाकड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यावेळी पत्नी नांदत नसल्याने मित्राच्या मदतीने अपहरण केल्याची कबुली आरोपी वडिलांनी दिली.