जितेंद्र कालेकर
ठाणे- आपल्याच २८ वर्षीय विवाहित मुलीवर बलात्कार करुन दुसऱ्या अल्पवयीन मुलीची लैंगिक छळवणूक करणाऱ्या ५० वर्षीय पित्याला दुहेरी सश्रम कारावासाची तसेच दहा हजार रुपये दंडाची तसेच दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठाण्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश तसेच विशष पोस्को न्यायाधीश व्ही. व्ही. विरकर यांनी शुक्रवारी सुनावली. ही शिक्षा सुनावल्यानंतर आरोपीने आपल्याला फाशीच द्यायची होती ना, असे म्हणत सरकारी वकीलांवर भर न्यायालयातच हल्ला केला.
यातील आरोपी पित्याला सहा मुली आहेत. तो नवी मुंबईतील रबाळे परिसरात वास्तव्याला होता. त्याची पत्नी गावी बिहारमध्ये असतांना त्याची मोठी मुलगी पतीच्या मारहाणीला कंटाळून माहेरी वास्तव्याला आली होती. त्यावेळी तिच्यावर त्याने एका रात्री बलात्कार केला होता. पुन्हा धमकी देत त्याने असाच प्रकार केल्याने यातून ती गरोदर राहिली होती. मात्र, तिने स्वत: गर्भपातही केला होता. परंतू, त्याने पुन्हा १४ वर्षीय अन्य अल्पवयीन मुलीवरही लैंगिक अत्याचाराचा प्रकार केला.
संतप्त झालेल्या मोठया पीडित मुलीने याप्रकरणी २०१८ मध्ये रबाळे पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर तो पसार झाल्यामुळे पोलिसांनी त्याला बिहारमधून अटक केली होती. याच खटल्याची ३० डिसेंबर २०२२ रोजी ठाणे न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी नऊ साक्षीदार तपासले. मुली आणि त्याची पत्नी यांनी आपला जबाब फिरविला. मात्र, परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे त्याला न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
दरम्यान, शुक्रवारी शिक्षा सुनावल्यानंतर ठाणे न्यालयातच ‘मला फाशीच द्यायची होती ना’ असे म्हणत सरकारी वकील हिवराळे यांच्यावर हल्ला केला. त्याने त्यांच्या उजव्या खांद्याला ठोसा मारला तितक्यात पोलिसांनी त्याला ओढले आणि कोर्टरुममधून बाहेर नेले. याप्रकरणी ठाणेनगर पोलिस ठाण्यात अॅड. हिवराळे यांनी गुन्हा दाखल केला आहे.