मडगाव: गोव्यात नात्याला काळीमा फासणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. फातोर्डामध्ये भावानेच सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याचे समोर आल्यानंतर आरोपी प्रमोद पवारला फातोर्डा पोलिसांनीअटक केली आहे.
फातोर्डामध्ये राहणारे नवनाथ सुर्यवंशी यांचा आरोपी मित्र होता. तसेच दोघांचेही टिश्यू पेपर सप्लाय करण्याचा व्यवसाय होता. संशयित प्रमोद नवनाथच्या पत्नीचा वर्गमित्र असल्याने त्या ओळखीने त्याचे घरी येणं- जाणं होते. त्याचप्रमाणे नवनाथची पत्नी त्याला आपला भाऊ मानत होती.नवनाथ प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेला आपल्या कामगारांना पगार देतो आणि त्यासाठी पैसे घरात आणून ठेवतो याची संशयिताला माहिती होती. 29 सप्टेंबर रोजी नवनाथने पगार देण्यासाठी पैसे घरात आणून ठेवले होते. त्याच दिवशी त्याला एका वाढदिवसाच्या पार्टीला जायचे असल्याने रात्री 8 च्या दरम्यान आपल्या पत्नीला घेऊन तो घर बंद करुन बाहेर पडला. हीच संधी साधून संशयिताने घरात प्रवेश करुन दागिन्यांचे कपाट फोडून दागिने व रोख लंपास केली.
नवनाथ आपल्या घरी रात्री 11 वाजता आल्यानंतर त्यांना या सर्व चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तात्काळ फातोर्डा पोलिस ठाण्यात आपली तक्रार दाखल केली. यानंतर या घटनेची माहीती पोलिसांना समजल्याचे समजताच आरोपी सतर्क होईल यासाठी पोलिसांनी ही बातमी गुप्त ठेवत चौकशी सूरु केली त्यावेळी नवनाथने या चोरीत प्रमोदचा हात असू शकतो असा संशय व्यक्त केला. मात्र त्यांची पत्नी हा आरोप स्वीकारायला तयार नव्हती. मात्र पोलीस निरीक्षक सलीम शेख यांनी या चोरीचा तपास लावत प्रमोदच्या हालचालीवर देखरेख ठेवत त्याची चौकशी केली असता या चोरीत त्याचाच हात असल्याचे कळून आले. चोरीचा ऐवज घरात ठेवला तर आपण अडचणीत येऊ शकेन या भीतीने त्याने आपल्या गाडीत हा ऐवज ठेवला होता. त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी तो जप्त केला आहे.