मावळ : स्वताचे राजकीय अस्तित्व संपण्याच्या भीतीने टाकवे बुद्रुक येथील विद्यमान उपसरपंचानेच खूनाचा कट रचून पुतण्या व त्याच्या मित्रांकडून यश रोहीदास असवले (वय २२) याचा खून केला असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. याप्रकरणी खूनाचा मुख्य सूत्रधार असणाऱ्या टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच रोहिदास राघू असवले (वय ४२ रा.टाकवे) याला पोलिसांनीअटक केली आहे. वडगाव न्यायालयात हजर केले असता २९ मे पर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. वडगाव मावळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेला यश याची आई रेखा रोहिदास आसवले ही काही महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत उपसरपंच रोहिदास राघु आसवले यांनी उभ्या केलेल्या उमेदवाराच्या विरूध्द मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. या विजयात यश याचा मोठा वाटा होता. काही दिवसात सरपंच पदाची निवडणूक होणार होती. सरपंचपदासाठी रेखा आसवले उभ्या राहणार होत्या.त्या सरपंच झाल्यातर आपले महत्व कमी होईल. यशमुळे आपले राजकीय अस्तित्व संपत चालल्याची भावना उपसरपंच रोहिदास याच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे खूनाचा कट रचला. पुतण्या रूतीक बाळू आसवले व त्याच्या मित्रांकडून शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास कोयत्याचे वार करून त्याचा खून करण्यात आला. यानंतर पोलिसांनी अवघ्या पाच तासात सात आरोपींना अटक केली. लोणावळा विभागाचे सहायक पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत व पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी यांनी सोमवारी या घटनेतील अटक केलेल्यांकडून कसून चौकशी केली असता. उपसरपंचाची माहिती उघड झाली. या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची संख्या आठ झाली आहे. त्यांच्या कडून मोबाईल, तीन मोटारसायकल व हत्यारे जप्त करण्यात आली आहे.
राजकीय अस्तित्व संपण्याच्या भीतीने विद्यमान उपसरपंचानेच रचला हत्येचा कट; टाकवे बुद्रुक खून प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 6:58 PM
मुख्य सुत्रधार विद्यमान उपसरपंचाला पोलिसांनी केली अटक
ठळक मुद्देवडगाव न्यायालयाने दिले आरोपीला २९ मे पर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश शुक्रवारी(दि. २२) रात्री दहाच्या सुमारास कोयत्याचे वार करून त्याचा खून