लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जान्हवी कुकरेजा (१९) हिच्या हत्येच्या आरोपात अटकेत असलेल्या प्रियकर श्री जोगधनकर (२२) आणि दिया पडळकर (१९) यांच्याकडे पोलीस अधिक तपास करत आहेत. अशात, प्रियकर आणि मैत्रिणीला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यानंतर, जान्हवीने मैत्रिणीला कॉल करून प्रियकराला गमाविण्याची भीती वर्तविली होती, तसेच ती फोनवर बोलत रडत असल्याचेही मित्रांंनी पाहिले असल्याची माहिती चौकशीत समोर येत आहे. या प्रकरणी खार पोलीस नेमक्या घटनाक्रमाचा शोध घेत आहेत.
खार पोलिसांनी जान्हवीच्या मित्र-मैत्रिणीकडे अधिक चौकशी सुरू केली आहे. यात पार्टीत श्री याला आमंत्रणही नसल्याची माहिती समोर आली. त्याला जान्हवीचा प्रियकर म्हणून सहभागी करून घेण्यात आले. अशात पार्टीदरम्यान दियाला उलट्या झाल्याने तिला भगवती हाइट्स या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील यश आहुजा याच्या घरी नेले. त्यानंतर, ही सर्व मंडळी पुन्हा गच्चीत आली. थोड्या वेळाने श्री आणि दियाला जान्हवीने आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्याने ती अवस्थ झाली.
तिने याबाबत मैत्रिणीला कॉल करून माहिती दिली. ती बराच वेळ फोनवर बोलताना रडत होती. तिला अन्य मित्र-मैत्रिणीने रडताना पाहिल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. श्री आणि दियाचा मोबाइल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी सीसीटीव्हीचे फुटेजही तपासण्यात येत आहे. अशात जान्हवीच्या हत्येनंतर दोघे जण पुन्हा पार्टीत सहभागी झाल्याचीही माहिती समजते. दरम्यान, पार्टीत ड्रग्जचे सेवन केले होते का? याबाबतही पथक चौकशी करत आहे. सध्यातरी घटनास्थळावरून असे कुठलेच पुरावे मिळालेले नाहीत.
नाइट कर्फ्युमुळे दिला होता नकारnजान्हवीची आई निधी कुकरेजा यांच्या म्हणण्यानुसार, जान्हवी एक हुशार मुलगी होती. बारावीतही तिने ९५ टक्के गुण मिळविले. त्यात दिया ही तिची बालपणीची मैत्रीण आहे. अशात श्रीही फक्त तिचा मित्र असल्याचेही त्यांनी नमूद केले. nवडिलांचा वाढदिवस साजरा केल्यानंतर दिया आणि श्रीने तिला सोबत येण्यास सांगितले. सुरुवातीला नाइट कर्फ्युमुळे तिने जाण्यास नकार दिला होता. मात्र, त्यांनी अवघ्या ३० मिनिटांत तिला घरी सोडतो, असे सांगून सोबत नेल्याचे त्यांनी सांगितले.