सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर उघडपणे बोलणारी अभिनेत्री कंगना राणौतने मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखविणारे वक्तव्य केले आहे. भाजपाचे आमदार राम कदम यांनी एक ट्विट केले होते. त्यावर कंगनाने उत्तर देत बॉलीवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचे म्हटले आहे. यावरून कंगना ट्रोल होत आहे.
कंगना राणौत गेल्या 100 तासांहून अधिक काळापासून ड्रग माफियांची पोलखोल करण्यास तयार आहे. मात्र, तिला पोलीस सुरक्षेची गरज असल्याचे सांगत महाराष्ट्र सरकार ते पुरवत नसल्याचे ट्विट राम कदम यांनी केले होते. यावर कंगनाने मुव्ही माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटत आहे. मुंबईमध्ये मला हिमाचल प्रदेश सरकार किंवा केंद्र सरकारची सुरक्षा हवी, मुंबई पोलिसांची नको, असे उत्तर दिले आहे. महत्वाचे म्हणजे राम कदम यांनी याचे समर्थनही केले आहे.
मात्र तिच्या या वादग्रस्त ट्विटवर नेटकऱ्यानी खरपूस समाचार घेतला आहे. फुकटच्या प्रसिद्धीसाठी काहीही बरगळू नकोस, मुंबई पोलिसांवर विश्वास नसेल तर मुंबईत महाराष्ट्रात राहू नकोस, येथून निघून जा, असा सल्ला देत तिचा निषेध केला आहे.
कंगनाने शनिवारी रिपब्लिक टिव्हीचा संपादक अर्णब गोस्वामीसोबत चर्चा केली. यावेळी रिया ही एक प्यादे आहे. तिला सुशांतला पैशांसाठी वापरले असेल, फिल्म मिळविण्यासाठी किंवा त्याला ड्रग देण्यासाठी. पण रियाच्या मागे कोण मास्टरमाईंड आहे, आपल्याला जाणून घ्यायला हवा, असे कंगना म्हणाली. रियाने सुशांतला आत्महत्येला प्रवृत्त केले किंवा हत्या केली याबाबत तुरुंगवास झाला हो वेगळा मुद्दा आहे. पण तिला हे सारे करण्यासाठी कोणी उद्यूक्त केले किंवा त्याचा उद्देश काय होता? सुशांतकडून त्याला काय हवे होते? सुशांतला त्याच्याबद्दल काही माहिती होते का? सुशांतला का मारले गेले आदी प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत असे कंगना म्हणाली.