कल्याण- शहराच्या पूर्व भागात राहणाऱ्या एका १८ वर्षीय तरुणीवर लैगिंक अत्याचार करुन तिचा व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली जात होती. तिला ब्लॅकमेल केले जात होते. या त्रसाला कंटाळून तरुणीने इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. यामध्ये एका तरुणीचाही सहभाग असून पोलिस तिचा शोध घेत आहे.
तरुणी महाविद्यालयात शिकत होती. १२ वीला तिला ७१ टक्के गुण मिळाले होते. तिला पदवीच्या पहिल्या वर्गात प्रवेश घ्यायचा होता. दोन दिवसापूर्वी तिने राहत्या घरी इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तिच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तरुणीच्या आत्महत्येच्या मागील कारण शोधण्यास पोलिसांनी सुरुवात केली. तरुणीचा मोबाईल पोलिसांनी तपासला असता. तिच्या मोबाईलमधील नोटपॅडमध्ये तिने काही गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. तिचे एका मुलावर प्रेम होते. ही गोष्ट काही तरुणांना कळाली. त्या तरुणांनी तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तिच्यावर लैगिंक अत्याचार करुन तिचा व्हीडीओ व्हायरल करण्याचे धमकाविले. ही माहिती समोर येताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. तरुणीला ब्लॅकमेल करुन आत्महत्येच प्रवृत्त केल्या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे विजय यादव, प्रमय तिवारी, सनी पांडे, शिवम पांडे, कृष्णा जायस्वाल, आनंद पांडे, निखिल मिश्रा अशी आहे. या प्रकरणात काजल जैयस्वाल या तरुणीचा पोलिस शोध घेत आहेत.
आत्महत्या केलेल्या तरुणीचे वडिल हे मुंबईला सुरक्षा रक्षकाचे काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. तरुणीची आई गृहिणी आहे. तरुणीला दोन लहान भाऊ आहे. पिडीत तरुणीच्या आई वडिलांनी सांगितले की, आरोपी हे धनाढ्य कुटुंबातील आहे. त्यांच्याकडून आमच्यावर दबाव टाकला जात आहे. पोलिसांनी आम्हाला सुरक्षितता पुरविली पाहिजे. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.
या प्रकरणी शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी आशा रसाळ यांनी पोलिसांकडे मागणी केली आहे की, आरोपींच्या विरोधात लैगिंक अत्याचाराचे कलम लावले पाहिजे. नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.