नवी दिल्ली - आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे एक व्यापारी कबुतरांना दाणे खायला घालायला गेला. त्यावेळी व्यापाऱ्याच्या गाडीच्या काचा फुटल्या होत्या. नंतर व्यापाऱ्याने गाडी तपासली असता पैशाने भरलेली बॅग कोणीतरी लांबवली होती. त्यात १० लाख रुपये होते. ही घटना नवी दिल्लीत घडली असून श्याम सेतिया असं या व्यापाऱ्याचं नाव आहे.
दिल्लीतील करोल बाग येथे चपलांचा होलसेल व्यापार करणारे सेतिया रविवारी आपल्या घरातून दुकानात जाण्यासाठी निघाले होते. त्यांना एका व्यक्तिला पैसे द्यायचे होते म्हणून सोबत 10 लाख रोख रक्कम त्यांनी घेतली होती. आपल्या गाडीच्या पाठच्या सीटवर त्यांनी पैशाने भरलेली बॅग ठेवली होती. रस्त्यात नेहमीच्या सवयीप्रमाणे एका ठिकाणी त्यांना कबुतरखाना दिसला आणि त्यांनी तिथे गाडी थांबवली आणि कबुतरांना दाणे टाकायला ते खाली उतरले. दरम्यान, कबुतरांना दाणे खायला घालून जेव्हा ते गाडीजवळ पोहोचले, त्यावेळी गाडीची काच तुटलेली असल्याचं त्यांनी पाहिलं. नंतर त्यांनी गाडी तपासली असता त्यांची दहा लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग गायब झालेली आढळली. पैसे चोरीला गेल्याचं पाहून सेतिया यांनी पोलिसात तक्रार केली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असून सीसीटीव्ही फुटेजच्याआधारे तपास सुरू आहे.