मुंबई : एका महिलेकडून फेसबुकवर आलेली फ्रेंड रिक्वेस्ट त्याने स्वीकारली आणि मग दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाले. खरं तर सुरुवातीला निमित्त होते नोकरीचे. पण नंतर मग दोघांमधली ‘घनिष्ठता’ वाढतच गेली आणि या छोट्याशा कथेचा शेवट झाला तो त्याच्या कोकेन तस्करीमध्ये अडकण्यात आणि पर्यायाने त्याच्या तुरुंगवारीत.
एका परदेशी महिलेच्या संपर्कात आलेल्या भारतीय नागरिकाचे फेसबुक चॅटिंग बराच काळ रंगल्यानंतर इथियोपियाची राजधानी असलेल्या आदिस अबाबा येथून एक पार्सल भारतात नेण्याची विनंती या महिलेने या भारतीय नागरिकाला केली. त्याच्या बदल्यात पैसे देण्यात येतील, असे सांगितले. महिलेवर जडलेला विश्वास आणि पैशांचे आमिष याला तो सहजच भुलला आणि आदिस अबाबा येथून चक्क २ किलो ८१० ग्रॅम कोकेन तो मुंबईत घेऊन आला.
हे कोकेन लपविण्याकरिता त्याने बॅगच्या आतील बाजूस विशिष्ट जागा तयार केली होती. त्यामध्ये हे कोकेन त्याने दडविले होते. मुंबई विमानतळावर उतरल्यावर तो अलगद कस्टम विभागाच्या जाळ्यात अडकला आणि त्याला अमलीपदार्थविरोधी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. त्याने बाळगलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत २८ कोटी १० लाख रुपये इतकी आहे.
दहा दिवसांत १३ किलो सोने जप्त
नव्या वर्षात पहिल्या दहा दिवसांत तिसऱ्यांदा मुंबई विमानतळावर अमलीपदार्थांची तस्करी पकडण्यात तपास यंत्रणांना यश आले आहे. ४ जानेवारी रोजी नैरोबी येथून आलेल्या एका भारतीय प्रवाशाकडे ४.४७ किलो हेरॉइन, तर ६ जानेवारी रोजी आदिस अबाबा येथून आलेल्या एका भारतीय प्रवाशाकडे दीड किलो कोकेन सापडले. मुंबई विमानतळावर दहा दिवसांत १३ किलो सोने आणि दीड कोटी रुपयांचे परकीय चलनदेखील कस्टम विभागाने जप्त केले आहे.