गुगलच्या एका माजी कर्मचाऱ्याने कंपनीच्या महिला बॉसवर गंभीर आरोप केले आहेत. न्यूयॉर्क पोस्टनुसार, रायन ओलोहान नावाच्या या कर्मचाऱ्याने आरोप केले आहेत की, त्याने महिला बॉसचे ऐकले नाही म्हणून त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. ओलोहानने खटला दाखल केला आणि दावा केला की टिफनी मिलर नावाच्या बॉसने चेल्सी, मॅनहॅटन येथे रात्रीच्या जेवणाच्या वेळी त्याची छेड काढली. मिलरने त्याला सांगितले की तिला माहित आहे की त्याला आशियाई महिलांविषयी आकर्षण वाटते.
न्यायालयीन कागदपत्रांनुसार, गुगलमधील प्रोग्रामॅटिक मीडियाच्या संचालक असलेल्या महिला आरोपीने कर्मचाऱ्याला स्पर्श केला, त्याच्या शारीरिक ठेवणीची प्रशंसा केली आणि कर्मचाऱ्याच्या वैवाहिक जीवनात प्रेम कमी झालंय, अशा शब्दांचा वापर करत टिप्पणी केली. अहवालानुसार, अन्न पेय आणि रेस्टॉरंट्सचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून ओलोहानच्या पदोन्नतीनंतर लगेचच कंपनीची बैठक फिग अँड ऑलिव्ह येथे झाली. मिलर त्याच्या नवीन टीममध्ये सहभागी होती.
ओलोहान सात मुलांचे वडील!
खटल्यानुसार, सात मुलांचे विवाहित वडील ओलोहान यांनी सांगितले की, सुरुवातीला ही घटना उघडकीस आणताना तो अस्वस्थ होता कारण त्या बैठकीत (डिनर पार्टीत) मद्यसेवनही केले गेले. त्यामुळे सारेच जण कमी अधिक प्रमाणात नशेत होते. खटल्यानुसार, ओलोहानने पुढील आठवड्यात एचआर विभागाला ही घटना कळवली, परंतु विभाग कारवाई करण्यात अयशस्वी ठरला. एचआरने कबूल केले की 'जर तक्रार 'विरुद्ध' असती म्हणजेच - एका महिलेने पुरुषावर छळाचा आरोप केला असता तर तक्रारीवरील कारवाई नक्कीच तीव्र स्वरूपाची असू शकली असती.'
खटल्यात पुढे, ओलोहानने दावा केला आहे की त्याने बॉसवर (आरोपी महिला) टीका केल्यावर आणि 'छोट्या गुन्ह्यासाठी' HR कडे तक्रार केल्यावर तिने याबाबत बदला घेण्यास सुरुवात केली.
ओलोहान यांनी आणखी काय आरोप केले?
लॉ सूटमध्ये म्हटले आहे की एप्रिल २०२२ मध्ये कराओके बारमध्ये, मिलरने त्याची थट्टा केली जेव्हा ओलोहान एका कंपनीच्या गेट-टू-गदरमध्ये आला. तिने पुन्हा एकदा म्हटले की ओलोहानला गोर्या स्त्रियांपेक्षा आशियाई महिला अधिक पसंत आहेत. ओलोहान पुढे म्हणाले की, त्याला त्याच्या सुपरवायझरकडून दबाव आणला गेला. त्याला सांगण्यात आले की, तिच्या व्यवस्थापन टीममध्ये 'उच्चपदस्थ अधिकारीही गौरवर्णीय (गोरे) आहेत.' त्यानंतर न्यूयॉर्क पोस्टने अहवाल दिला की जुलैमध्ये, Google ने मिस्टर ओलोहान यांना काढून टाकले आणि कंपनीशी त्यांचा 16 वर्षांचा संबंध संपवला.
आरोपी महिला बॉसने आरोप फेटाळून लावले!
द पोस्टला दिलेल्या निवेदनात, आरोपी मिलरच्या प्रवक्त्यांनी त्यांच्या क्लायंटवरील आरोपांचे खंडन केले. "हा खटला अनेक खोट्या गोष्टींनी भरलेला आहे. यातील घटना केवळ काल्पनिक आहे. एका असंतुष्ट माजी कर्मचाऱ्याने हे प्रकरण तयार केलेले आहे," असे आरोपी महिलेच्या प्रवक्त्यांनी सांगितले.