नेत्यांची म्हैस, कुत्रा, मांजर हरवले तर पोलिसांना त्यांच्या शोधासाठी लावणे काही नवे नाही. पण आएपीएस अधिकाऱ्याने एका पेनासाठी सगळ्या पोलिसांना कामाला लावणे हा प्रकार हिमाचल प्रदेशमध्ये घडला आहे. पेन काही सापडले नाही, परंतू हा चर्चेचा विषय बनला आहे. हरवलेल्या पेनाची किंमत काही हजारांत असल्याचे सांगितले जात आहे.
जिल्हा मुख्यालय कुल्लूमध्ये एक महिला आयपीएस अधिकारी पोलीस भरती करण्यासाठी आली होती. तेव्हा तिचे महागडे पेन हरवले. ते शोधण्यासाठी तिने मुख्यालयातील पोलिसांना कामाला लावले. या पेनाचा शोध मुख्यालयातच नाही तर ढालपूरच्या अनेक दुकानांमध्ये घेण्यात आला. त्या दुकानदारांची चौकशी करण्यात आली. सीसीटीव्ही तपासले गेले. ही महिला अधिकारी कुल्लूमध्ये सुरु असलेल्या पोलीस भरतीसाठी ड्यूटीवर आली आहे.
रविवारी सायंकाळी ती ढालपूरच्या हॉस्पिटलशेजारील काही दुकानांमध्ये काही वस्तू खरेदी करण्यासाठी आली होती. याच वेळी तिचे पेन कुठेतरी हरवले. तिने पेन शोधायचा प्रयत्न केला परंतू मिळाले नाही. यामुळे सोमवारी दुपारनंतर पोलिस अधिकारीच या दुकानांमध्ये पोहोचले. त्यांनी पेनाविषयी चौकशी केली. सीसीटीव्ही फुटेजदेखील तपासले. कुल्लूचे पोलीस अधिक्षक गुरदेव शर्मा यांना याबाबत विचारले असता त्यांनी या प्रकाराची आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले.