राजस्थानात भ्रष्टाचाराची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिला अधिकाऱ्याने एका वर्षात तब्बल 26 फ्लॅट्स खरेदी केले आणि फक्त दोन दिवसांत या सर्वांची नोंदणी (रजिस्ट्री) करण्यात आली. ज्योती भारद्वाज असं या महिला अधिकाऱ्याचं नाव असून त्या जयपूर सचिवालयात शासन सचिव पदावर कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या वर्षभरात ज्योती भारद्वाज यांनी 26 फ्लॅट्स खरेदी केले. त्यातील 15 फ्लॅट्सची नोंदणी त्यांच्या स्वत:च्या नावावर असून उर्वरित 11 फ्लॅट्स त्यांचा मुलगा रोशन वशिष्ठ याच्या नावावर आहेत. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच बिल्डरने आपली फसवणूक झाल्याचा दावा केला. तसेच प्रकरण कोर्टात असल्याचं सांगितलं. महिला अधिकाऱ्याशी याबाबत अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही.
जयपूर सचिवालयात कार्यरत असलेल्या अधिकारी ज्योती भारद्वाज शासन सचिव पदावर कार्यरत आहेत. अलवरमध्ये त्या जिल्हा कोषाधिकारी आणि मत्स्य विद्यापीठात आर्थिक नियंत्रक पदावर कार्यरत राहिल्या आहेत. कर्मचाऱ्यांना दरवर्षी त्यांच्या संपत्तीची माहिती सरकारला द्यावी लागते. त्यामध्ये ज्योती भारद्वाज यांनी तीन घरांचा उल्लेख केला होता.
यातील एक त्यांच्या पतीच्या नावावर होतं. या घरासाठी पतीने कर्ज घेतलं आहे. तर अन्य दोन घरं त्यांनी स्वत:च्या नावावर दाखवली होती. दुसरीकडे सब रजिस्टर कार्यालय जयपूरमध्ये 4, 5 मार्च 2022 रोजी 26 फ्लॅट्सची नोंदणी झाली आहे. ज्याची किंमत 4 कोटी 71 लाख रुपये आहे. सध्या या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.