फेमिना मिस इंडिया झालेल्या शिवांकिता दीक्षित सायबर फ्रॉडची बळी ठरली. ठगांनी तिला सुमारे दोन तास व्हिडीओ कॉलवरून डिजिटल अरेस्टमध्ये ठेवलं आणि नंतर ९९ हजार रुपये उकळले. सीबीआय अधिकारी असल्याचं भासवून या भामट्याने शिवांकिताला मनी लाँड्रिंग आणि अपहरणाचे पैसे तिच्या बँक खात्यात येत असल्याचं सांगून धमकी दिली. या घटनेनंतर शिवांकिता घाबरली आहे
आग्रा येथील मानस नगर येथे राहणारी शिवांकिता दीक्षित २०१७ मध्ये फेमिना मिस इंडिया वेस्ट बंगाल झाली आहे. तिला एक अनोळखी फोन आला. फोन करणाऱ्याने स्वत:ची ओळख सीबीआय अधिकारी अशी दिली. त्याने शिवांकिताला सांगितलं की, तुमच्या आधार कार्डवर नोंदणीकृत सिमवर दिल्लीत बँक खातं उघडलं आहे. मानवी तस्करी, मनी लाँड्रिंग आणि मुलांचे अपहरण यासाठी खंडणीची रक्कम या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आली आहे.
अशाप्रकारे शिवांकिता फसवणुकीच्या जाळ्यात अडकली आणि व्हिडीओ कॉलवर बोलू लागली. शिवांकिता दीक्षितच्या मते - व्हिडीओ कॉलवर एक व्यक्ती पोलिसांच्या ड्रेसमध्ये दिसला. त्याच्या गणवेशावर तीन स्टार होते. पार्श्वभूमीत सायबर पोलीस दिल्ली असं लिहिलं होतं. एकामागून एक चार अधिकाऱ्यांशी बोलणं झालं. तसेच एका महिला अधिकाऱ्याशी बोलले. हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढा अन्यथा तुम्हाला अटक करून तुरुंगात जावे लागेल, असं ते म्हणाले.
शिवांकिता सुमारे दोन तास व्हिडीओ कॉलवर राहिली आणि समोरची व्यक्ती जे काही सांगत होती ते करत होती. याच दरम्यान, शिवंकिताने फसवणूक करणाऱ्याने नमूद केलेल्या खात्यावर दोन वेळा ऑनलाइन ९९ हजार रुपये पाठवले. शिवांकिताने पैसे पाठवण्याची लिमीट संपल्याचं सांगताच समोरच्या व्यक्तीने दुसऱ्या अकाऊंटवरून पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले.
इकडे शिवांकिता सायबर फ्रॉडशी बोलत होती तर दुसरीकडे तिचे वडील संजय दीक्षित खोलीच्या बाहेर दरवाजा ठोठावत होते. पण शिवांकिता दार उघडत नव्हती. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर वडिलांना समजलं की त्यांची मुलगी सायबर फसवणुकीची शिकार झाली आहे. त्यानंतर वडिलांनी आपल्या मुलीसोबत जाऊन पोलिसांत तक्रार दाखल केली. शिवंकिताने सांगितलं की, मी हेल्पलाइनवर कॉल करून तक्रार केली आणि नंतर ईमेलद्वारे सायबर क्राईम सेलकडे तक्रार केली.