हितेन नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, कासा/पालघर : फेसबुकवरून मैत्री करून रेल्वेत नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका तरुणीसह अन्य तिघांची साडेपंधरा लाखांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोन आरोपींना उत्तर प्रदेशमधून तर एका आरोपीला नाशिकमधून अटक करण्यात कासा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बंडगर आणि त्यांच्या टीमला यश आले आहे.
मुख्य आरोपी दीपक किशोर दर्शन (रा. बोईसर) हा फेसबुकच्या माध्यमातून तरुणांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी मैत्री वाढवत होता. त्यानंतर आरोपी हा त्याच्या इतर साथीदारांसह फेसबुकवर मैत्री केलेल्या तरुण-तरुणींना माझी रेल्वेत मोठी ओळख आहे आणि त्या आधारे मी तुम्हाला रेल्वे विभागात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपयांची रक्कम उकळत असे.
डहाणू तालुक्यातील योगिता महादू चौधरी यांसह सचिन भोये, स्नेहा डोके आणि शांताराम आहाडी अशा चौघांनी रेल्वेत नोकरी लावून देण्यासाठी आरोपीला एकूण साडेपंधरा लाख रुपये रक्कम दिली होती; मात्र नोकरीसंदर्भात काही ठोस कार्यवाही होत नसल्याने आणि नंतर आरोपीने आपला मोबाइल बंद करून ठेवल्याने शेवटी योगिता यांनी कासा पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली होती. कासा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या टीमने मुख्य आरोपीला नाशिकमधून अटक केली. डहाणू न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
फसवणूक झाली असेल तर संपर्क साधा...
योगिता हिच्यासह पालघरमधील अन्य काही तरुण-तरुणी या आरोपीच्या संपर्कात असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे अशाप्रकारे कोणाची फसवणूक झाली असेल त्यांनी पुढे येण्याचे आवाहन पोनि बंडगर यांनी केले आहे. सहायक पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांसह कासाचे पोलिस उपनिरीक्षक संदीप नागरे व पोलिस कर्मचारी हवालदार संदीप चव्हाण यांच्या टीमने तपास केला.